सरदार नगरच्या 200 हून अधिक कुटुंबांची तहान भागली

 

गावाकडची बातमी


सरदार नगरच्या 200 हून अधिक कुटुंबांची तहान भागली!

युवानेते करणभाऊ एंड्रलवार यांच्या पुढाकाराने पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय



किनवट : शहरातील सरदार नगर प्रभाग क्रमांक 10 मधील अनेक दिवसांपासून भेडसावत असलेली पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर मार्गी लागली आहे. युवानेते करण एंड्रलवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नगरपरिषद किनवटच्या वतीने नवीन बोअरवेल उभारण्यात आली असून, त्यामुळे परिसरातील 200 हून अधिक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सरदार नगर परिसरात पाण्याअभावी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी लांब अंतर पार करावे लागत असल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. ही गंभीर बाब लक्षात घेऊन करण एंड्रलवार यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून नवीन बोअरवेल मंजूर करून घेतली.

नगराध्यक्षा सुजाता एंड्रलवार यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद प्रशासनाने तातडीने आवश्यक कार्यवाही करत बोअरवेलचे काम पूर्ण केले. यामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रसंगी नगरपरिषदेचे बांधकाम सभापती श्रीरामजी नेम्मानिवार, वसंतभाऊ राठोड तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नागरिकांनी भावना व्यक्त करत सांगितले की, "अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी करण एंड्रलवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. नगराध्यक्षा सुजाता एंड्रलवार यांच्या सहकार्यामुळे आज हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला असून आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे."


स्थानिकांच्या मते, पाणी ही जीवनावश्यक गरज असून नवीन बोअरवेलमुळे सरदार नगरमधील शेकडो कुटुंबांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत विकासकामे पुढेही सुरू राहतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post