जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर
अमरावती, दि. ३० जून : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र राज्य महिला सहभाग विभागांतर्गत अमरावती जिल्हा महिला सहभाग विभाग यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या "आम्ही समतावादी" अभियानांतर्गत वटसावित्री निमित्त अमरावती शहर, बडनेरा, दर्यापूर तसेच विविध भागांत महिलांशी प्रत्यक्ष संवाद, पर्यावरण जनजागृती आणि वृक्षारोपणाचे उपक्रम उत्साहात पार पडले. श्रद्धेचा आदर राखत समता, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्त्री-पुरुष समानता, आरोग्य जागरूकता आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश या अभियानातून देण्यात आला.
संपूर्ण अभियानाचे मार्गदर्शन अमरावती जिल्हा महिला सहभाग विभागाच्या जिल्हा कार्यवाह विजया करोले यांनी केले. तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मंदा श्रीधर, जिल्हा प्रधान सचिव विजय डवरे तसेच अमरावती जिल्ह्यातील सर्व शाखांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला सहभाग विभागाच्या सदस्यांचे मोलाचे मार्गदर्शन, सहकार्य व सक्रिय सहभाग लाभला.
अभियानादरम्यान महिलांशी संवाद साधताना वटसावित्री व्रतामागील भावनेचा आदर व्यक्त करत वडाच्या वृक्षाचे पर्यावरणीय, सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व पटवून देण्यात आले. केवळ पूजा न करता वडासह इतर वृक्षांचे संवर्धन व वृक्षारोपण करणे ही काळाची गरज असल्याचा संदेश देण्यात आला. अनेक ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाची प्रत्यक्ष कृतीही करण्यात आली.
यावेळी पती-पत्नीमधील परस्पर सन्मान, घरकामातील समान सहभाग, कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत महिलांचा समान अधिकार, संविधानाने दिलेली समानतेची मूल्ये तसेच परंपरा आणि आधुनिक वैज्ञानिक विचार यांची सांगड या विषयांवर महिलांशी मुक्त संवाद साधण्यात आला. उपवास करणाऱ्या महिलांनी पुरेसे पाणी पिणे, संतुलित आहार घेणे व स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शनही करण्यात आले.
बडनेरा शाखेच्या वतीने मोनाली सदावर्ते यांच्या समन्वयातून आयोजित कार्यक्रमात पूजा दिहाडे, दिव्या पाडवार, संगीता पाडवार, शुभांगी पाडवार, शुभांगी झंझाड, वंदना झंझाड, पूजा झंझाड, रीना झंझाड, वंदना लेंडे, शीतल वैद्य, पंचफुला पाडवार, वर्षा खराबे, वनमाला झंझाड, चंद्रकला पाडवार आणि निर्मला किंडरळे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
अमरावती शाखेच्या वतीने कांचन रुपुने यांनी महिलांशी समता, आरोग्य आणि पर्यावरण या विषयांवर प्रभावी संवाद साधला.
दर्यापूर शाखेच्या वतीने स्वाती चोंडके यांनी महिलांशी संवाद साधत समता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
अमरावती शहरातील अंबादेवी, बुधवारा आणि हनुमान नगर परिसरात जिल्हा महिला सहभाग विभागाच्या कार्यवाह विजया करोले यांच्या नेतृत्वाखाली महिलांशी प्रत्यक्ष संवाद साधून समता, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि संविधानिक मूल्यांविषयी जनजागृती करण्यात आली.
या सर्व उपक्रमांमध्ये विविध भागांतील मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला. श्रद्धेला धक्का न लावता समतेचा विचार मांडण्याच्या या अभियानाचे महिलांनी मनापासून स्वागत केले. परंपरेसोबत वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे, स्त्री-पुरुष समानता, पर्यावरण संरक्षण आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज असल्याचे मत सहभागी महिलांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या "आम्ही समतावादी" अभियानाच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यात महिलांमध्ये संविधानिक मूल्ये, वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरण संवर्धन आणि स्त्री-पुरुष समानतेबाबत सातत्याने जनजागृती सुरू असून, हा जिल्हास्तरीय उपक्रम त्याच दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.
