रामनगर : लग्नसमारंभासाठी पत्नीसह तेलंगणातील पिपरेड येथे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला आदिलाबाद आगाराच्या भरधाव एसटी बसने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवार (दि. २४ जून) रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजता रामनगरजवळील नाल्याजवळ घडली.
मृत व्यक्तीचे नाव रमेश गंगाधर तुमाने (वय ४५, रा. नागेझरी) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रमेश तुमाने हे पत्नीसमवेत दुचाकी क्रमांक एमएच ४९ के २४९२ वरून नागेझरी येथून तेलंगणातील पिपरेड येथे लग्नसमारंभासाठी निघाले होते. दरम्यान, रामनगरजवळील नाल्याजवळ आदिलाबादकडून घाटंजीकडे भरधाव वेगाने जाणारी एसटी बस क्रमांक टीजी ०१ झेड ००१३ यांनी त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
अपघात इतका भीषण होता की रमेश तुमाने यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी या धडकेनंतर दुचाकीवरून बाजूला फेकल्या गेल्याने सुदैवाने बचावल्या. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच गावातील युवकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. तसेच पारवा पोलीस ठाण्याचे ठाणेदार हेमंत चौधरी हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
या अपघातामुळे नागेझरी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

