"बालमनाला निखळ आनंद देणारा एक झरा "

 



आपल्या मातृभाषेमध्ये साहित्य लेखन करणे ही अत्यंत स्वाभिमानाची बाब आहे आणि बालमनाला आनंद देण्याचं एक माध्यम आहे. बाल साहित्य क्षेत्रात बालगीते लिहून मुलांना निसर्गाची ओळख करून देऊन बालमनावर आपण चांगले संस्कार करू शकतो. कळत, नकळत निसर्ग आपल्याला काय सांगतो? निसर्गाशी आपलं नातं काय? हे बालकांना बालगीताच्या माध्यमातून सांगता येतं. शब्दशिल्प साहित्य प्रकाशन, नागपूर यांच्या माध्यमातून प्रकाशित झालेलं "बालगीतांच्या मेघसरी" हा असाच एक बालकाव्यसंग्रह आहे. या बालकाव्यसंग्रहाला प्रस्तावना सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी रत्नाकर तिडके यांची लाभलेली आहे. या बालकाव्यसंग्रहामध्ये 35 बालगीते आहेत.

 बालगीतांच्या मेघसरी या पुस्तकाचं मुखपृष्ठ मुलांना आवडणारं व आकर्षित करणार आहे. मुखपृष्ठावरील चित्राची रंगसंगती खूप छान आहे. नौका बघितल्यावर आपण सुखदुःखाच्या अश्याच नौकामधून विहार करीत पुढे पुढे जात असतो. बालमनाला सहज, सोप्या भाषेत आनंद देणारा आणि मार्गदर्शन करणाऱ्या या शब्दसरी म्हणजे "बालगीतांच्या मेघसरी" हा बालकाव्यसंग्रह होय!

 निसर्गात असलेले पक्षी, प्राणी, वृक्षवल्ली काय सांगतात, हे बालगीत वाचल्यानंतर आपल्याला कळतं. "बालगीतांच्या मेघसरी "या बालकाव्यसंग्रहातून कवयित्री मेघा भांडारकर हिने केलेला पहिला प्रयत्न यशस्वी व कौतुकास्पद आहे. कट्टी बट्टी, ससा आणि कासव, झाड काय म्हणतं, मांजरीचं भांडण, पतंग, सुंदर मन ही बालगीते मला फार आवडली. ही बालगीत वाचल्यानंतर जो बोध आपल्याला मिळतो, त्याचा अर्थ असा आहे की, जीवन जगताना चांगली तत्वे आपण स्वीकारली पाहिजे. कवितेचा अर्थ मुलांना समजवून

सांगताना बालमनावर योग्य संस्कार होतात. काळानुसार परिवर्तन जरी आवश्यक असेल, तरी संस्कृती आणि संस्कार याचे भान मुलांनी ठेवावे. हे मुलांच्या बालपणातच मुलांवर 

बिंबवावे लागतात. एक परिपक्व व्यक्तिमत्व घडविण्यासाठी सगळ्यात उत्तम काळ म्हणजे बालपण! याच बालपणासाठी गीतांच्या माध्यमातून केलेला कवयित्रीचा पहिला प्रयत्न म्हणजे " बालगीतांच्या मेघसरी"! हा बालकाव्यसंग्रह प्रत्येकाने वाचला पाहिजे. लिहणे जितकं महत्त्वाचं, तेवढंच वाचणं सुद्धा महत्त्वाचं असते. वाचन केल्याने आपलं मन आपल्याला बालपणात घेऊन जातं. निसर्गाची भाषा आपल्याला कळायला लागते. हा काव्यसंग्रह वाचल्यानंतर मला भावनात्मक आनंद मिळला. हाच आनंद तुम्हाला मिळावा, यासाठी या बालकाव्यसंग्रहाचे वाचन तुम्ही करावं हीच अपेक्षा!

     श्रीमती परिजा धाबेकर, साकोली

Post a Comment

Previous Post Next Post