घाटंजी-पांढरकवडा रोडवर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक गंभीर जखमी

 




तालुका प्रतिनिधी | निजामोद्दिन सोलंकी



घाटंजी-पांढरकवडा मार्गावरील नुक्ती गावाजवळ रविवारी (दि. 21 जून 2026) मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात एका युवकाला गंभीर दुखापत झाली. अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. उमेश गणपत भेंडारे (वय 34) असे जखमी युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उमेश भेंडारे हे आपले काम आटोपून ॲक्टिव्हा दुचाकीने घरी परतत होते. नुक्ती गावाजवळ मागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, उमेश हे रस्त्यालगतच्या खोल नालीत जाऊन पडले.


अपघातानंतर काही वेळ जखमी युवक नालीतच पडून होता. दरम्यान, त्या मार्गाने जाणाऱ्या काही नागरिकांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ नगरसेवक निखिल देठे यांना फोनद्वारे माहिती दिली. देठे यांनी तातडीने रुग्णसेवक मुज्जू पटेल व त्यांच्या मित्रपरिवाराशी संपर्क साधला. माहिती मिळताच मुज्जू पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी उमेश यांना नालीतून बाहेर काढले व घाटंजी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.


जखमीच्या नाक व तोंडातून रक्तस्त्राव होत असल्याने तसेच गंभीर दुखापत झाल्याचे लक्षात घेऊन घाटंजी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने यवतमाळ येथे रेफर केले. त्यानंतर मुज्जू पटेल यांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून जखमीला यवतमाळ येथे रवाना केले.


दरम्यान, घटनेची माहिती घाटंजी पोलीस ठाण्याचे एपीआय सचिन राठोड यांना देण्यात आली. माहिती मिळताच त्यांनी तत्परता दाखवत पोलीस उपनिरीक्षक मडावी, जमादार विनोद मेश्राम, नैताम मेजर व इतर पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी पाठविले. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला असून, धडक देऊन फरार झालेल्या अज्ञात वाहनाचा व चालकाचा शोध सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post