प्रतिनिधी श्रीकांत राऊत यवतमाळ
उमरखेड :-जिल्ह्यात अवैध धंदे, अवैध शस्त्रसाठा व गुन्हेगारी प्रवृत्तींवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्रे व गंभीर गुन्हे सुरू राहणार नाहीत, तसेच गुन्हेगारांचा शोध घेऊन अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यात यावे, अशा सूचना पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या आहेत.
या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक २३ जून रोजी उमरखेड उपविभागात गस्त घालत असताना पोलिस स्टेशन बिटरगाव हद्दीतील मौजे ढाणकी येथील सावळेश्वर रोड, आदर्श नगर ले-आऊट परिसरात एका इसमाकडे तलवार व खंजीर असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाड टाकली. तेथे अर्जुन निळकंठ लोखंडे (वय १९ वर्षे, रा. पिंपरी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) हा सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था भंग होईल अशा हेतूने फिरत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या हातातील प्लास्टिक पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये एक धारदार स्टीलची तलवार व एक खंजीर आढळून आला.
पोलिसांनी दोन्ही शस्त्रे जप्त केली असून त्यांची अंदाजे किंमत ₹४ हजार असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी अर्जुन लोखंडे याच्याविरुद्ध आर्म्स ॲक्ट कलम ४ व २५ अन्वये पोलिस स्टेशन बिटरगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी त्याला बिटरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा तसेच मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात स.पो.नि. धिरज बांडे, पोउपनि/अमोल राठोड, सफौ/मुन्ना आडे, सफौ/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, पोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
