प्रतिनिधी श्रीकांत राऊत | यवतमाळ
यवतमाळ : जिल्ह्यात अवैध धंदे, अवैध शस्त्र बाळगणारे तसेच वन्यजीव शिकारी करणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) यवतमाळने महत्त्वपूर्ण कारवाई करत वन्यजीव शिकारीसाठी वापरण्यात येणारी देशी बनावटीची दुबार बंदूक जप्त केली आहे. या कारवाईत सुमारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक २२ जून रोजी पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, महागाव तालुक्यातील काळी (दो) परिसरातील शेतशिवारात एक इसम वन्यजीव शिकारीच्या उद्देशाने बंदूक घेऊन थांबला आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीचे नाव सय्यद कलीम उर्फ काळ्या सय्यद हाफिज (वय ३२, रा. काळी दो, ता. महागाव, जि. यवतमाळ) असे निष्पन्न झाले. त्याच्याकडून देशी बनावटीची दुबार बंदूक जप्त करण्यात आली.
पुढील चौकशीत आरोपीने मार्च महिन्यात पांढुर्णा/इंजनी शेतशिवार परिसरात नीलगायीची शिकार केल्याची कबुली दिली. या प्रकरणी वन विभागाने यापूर्वीच भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. आरोपीविरुद्ध आता भारतीय हत्यार कायदा कलम ३ व २५ अन्वयेही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स.पो.नि. धिरज बांडे, पोउपनि अमोल राठोड आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
वन्यजीव संरक्षणासाठी पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून अवैध शस्त्र बाळगणारे आणि वन्यजीवांची शिकार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

