भरत तिवारी यांच्या कथित बनावट एन्काऊंटरविरोधात वीर अशोक सम्राट संघटनेचे निवेदन

 

महाराष्ट्र राज्य वर्धा





विशेष प्रतिनिधी| निलेश रामगावकर 


वर्धा, दि. २२ जून : बिहार राज्यातील भोजपूर जिल्ह्यात सामाजिक कार्यकर्ते भरत तिवारी यांच्या कथित बनावट एन्काऊंटरमध्ये झालेल्या मृत्यूचा निषेध नोंदवत वीर अशोक सम्राट संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा येथे निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भारताचे राष्ट्रपती तसेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे पाठविण्यात आले.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की, भरत तिवारी हे सामाजिक प्रश्न, भ्रष्टाचार आणि प्रशासकीय त्रुटींविरोधात सातत्याने आवाज उठवणारे कार्यकर्ते होते. त्यांचा मृत्यू हा संशयास्पद असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, १७ जून २०२६ रोजी घडलेल्या घटनेचे व्हिडिओ पुरावे व प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे भरत तिवारी यांनी आत्मसमर्पण केले होते, असा दावा करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यावर गोळीबार झाल्याचा आरोप संघटनेने केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संघटनेने या घटनेची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली स्थापन करण्यात येणाऱ्या विशेष तपास पथकामार्फत (SIT) करण्याची मागणी केली आहे. तसेच दोषी आढळणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

याशिवाय पीडित कुटुंबाला सुरक्षा व आर्थिक मदत देण्याबरोबरच नागरिकांवरील कथित पोलिस अत्याचार रोखण्यासाठी प्रभावी कायदेशीर उपाययोजना करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विकी सवाई, शहराध्यक्ष कोमल म. झामरे, जिल्हाध्यक्ष अक्षय मानकर, राहुल रमेशराव भगत, मनोज तुळशीराम भगत तसेच प्रशिल प्रल्हाद नराजे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post