अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट ₹५० हजार प्रति हेक्टर मदत द्या; शिष्यवृत्ती योजना पूर्ववत सुरू करा

 




 कॉग्रेस,युवक काँग्रेस व NSUI ची तहसील कार्यालयावर धडक; आंदोलनाचा इशारा


जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर 


नांदगाव खंडेश्वर


नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ३० जुलै २०२६ रोजी झालेल्या ढगफुटीसदृश अतिवृष्टीमुळे शेती, घरे आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट ₹५० हजार प्रति हेक्टर आर्थिक मदत, घरांचे पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई, पीकविम्याची २५ टक्के आगाऊ रक्कम आणि बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी बंद करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती योजना तात्काळ पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी कॉग्रेस,युवक काँग्रेस व NSUI च्या वतीने नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर धडक देण्यांत आली. यावेळी तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले की, अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील उभी पिके पाण्याखाली गेली असून नदी-नाल्यांच्या पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील स्प्रिंकलर संच, पाईप, नोझल व इतर सिंचन साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले. अनेक गावांमध्ये घरांमध्ये पाणी शिरून घरे कोसळली असून बाधित कुटुंबांना तातडीने पंचनामे करून प्रति घर ₹१ लाखांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

याशिवाय अतिवृष्टीमुळे अनेक रस्ते, पूल आणि पुलांचे कठडे वाहून गेल्याने ग्रामीण भागातील दळणवळण विस्कळीत झाले आहे. या सर्व रस्त्यांची आणि पुलांची तातडीने दुरुस्ती करून वाहतूक पूर्ववत सुरू करावी, अशीही मागणी करण्यात आली. पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना त्वरित २५ टक्के आगाऊ पीकविमा मंजूर करावा तसेच अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांचे शाळा व महाविद्यालयांचे १०० टक्के शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

मोर्चादरम्यान राज्य शासनाने बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजना बंद करण्याच्या निर्णयाचाही तीव्र निषेध करण्यात आला. इयत्ता १ ली ते ८ वी, ९ वी ते ११ वी तसेच पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्ती योजना तात्काळ पूर्ववत सुरू करून श्रमिकांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी करण्यात आली. शासनाने हा निर्णय तातडीने मागे न घेतल्यास कॉग्रेस युवक काँग्रेस व NSUI च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव परीक्षित जगताप, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष दीपक भगत,शहर काँग्रेस अध्यक्ष अमोलभाऊ धवसे, NSUI अध्यक्ष ऋषिकेश मुंदे, तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष व सोशल मीडिया प्रमुख मंगेश जोगे, जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष प्रसाद भगत, प्रवीण मोकडे, शिवाजी चव्हाण, सुनील इंझडकर, गोलू मेटे, ज्योतिपाल चवरे, शंतनू धवस, कैलास लांडे, तन्वीर पटेल, अतुल दुधे,शेख हारून, मो. समीर, विजय चिंचे, उत्तम पवार, प्रतीक गावणार, हरिओम सारवे, जुनेद, कुंदन राऊत, प्रमोद इंझडकर, मोफिक शेख यांच्यासह कॉग्रेस,युवक काँग्रेस, NSUI व काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Post a Comment

Previous Post Next Post