पेसा क्षेत्रातील उमरी (बा) व वानोळा येथे मोबाईल नेटवर्कचा तीव्र अभाव; तातडीने टॉवर उभारण्याची शिवसेनेची मागणी

Village news network

Village news network



किनवट/माहूर | प्रतिनिधी

पेसा क्षेत्रातील मौजे उमरी (बा.) ता. किनवट आणि वानोळा ता. माहूर या मुख्य बाजारपेठ परिसरात मोबाईल नेटवर्कचा तीव्र अभाव असल्याने विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येची दखल घेऊन शिवसेना नांदेड जिल्हा सहसंपर्क प्रमुख रविभाऊ उत्तमराव राठोड यांनी जिल्हा दूरसंचार समितीचे अध्यक्ष तसेच जिल्हा माहिती विज्ञान केंद्र (NIC), नांदेड येथील सदस्य सचिव यांना लेखी निवेदन सादर करून तातडीने मोबाईल टॉवर उभारण्याची मागणी केली आहे.


३ ऑगस्ट २०२६ रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनात, या दुर्गम व डोंगराळ भागात आजही Jio, BSNL, Airtel आणि Vodafone Idea (Vi) यांसह कोणत्याही मोबाईल सेवा प्रदात्याचे समाधानकारक नेटवर्क उपलब्ध नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हजारो आदिवासी बांधव, शेतकरी, व्यापारी आणि विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असून डिजिटल सेवांचा लाभ घेणेही कठीण झाले आहे.


राठोड यांनी निवेदनात म्हटले आहे की, उमरी (बा.) व वानोळा ही दोन्ही ठिकाणे परिसरातील प्रमुख बाजारपेठा असून अनेक गावे, तांडे, वाड्या आणि आदिवासी वस्त्यांचे केंद्र आहेत. मात्र मोबाईल नेटवर्क नसल्याने नागरिकांना साध्या फोन कॉलपासून ते ऑनलाइन शासकीय सेवांसाठीही अनेक किलोमीटरची भटकंती करावी लागत आहे.


शेतकऱ्यांना पीककर्ज, ई-केवायसी (e-KYC), आधार ओटीपी, बँक खाते लिंकिंग, कर्जमाफी आदी शासकीय प्रक्रियांमध्ये मोठ्या अडचणी येत आहेत. दुसरीकडे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज, प्रवेश प्रक्रिया, गुणपत्रिका डाउनलोड आणि इतर ऑनलाइन कामांसाठी १० ते १५ किलोमीटरपर्यंत प्रवास करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


'डिजिटल इंडिया' आणि 5G युगाच्या घोषणा होत असताना या भागातील नागरिकांना अद्याप मूलभूत मोबाईल नेटवर्क सुविधेपासूनही वंचित राहावे लागत असल्याची खंत व्यक्त करत, प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.


प्रमुख मागण्या

- उमरी (बा.) व वानोळा येथे Jio, BSNL, Airtel, Vi यांसह सर्व कंपन्यांचे 4G/5G मोबाईल टॉवर तातडीने मंजूर करून उभारावेत.

- जिल्ह्यातील सर्व मोबाईल सेवा प्रदात्यांना अखंडित नेटवर्क सेवा देण्याचे निर्देश द्यावेत.

- कायमस्वरूपी टॉवर उभारेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात मोबाईल टॉवर व्हॅनची व्यवस्था करून नागरिकांना सेवा उपलब्ध करून द्यावी.

परिसरातील नागरिकांच्या मूलभूत दळणवळणाच्या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासनाने तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा रविभाऊ उत्तमराव राठोड यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post