हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; धार्मिक विधी, सत्कार व लंगरचे आयोजन — पोलिसांच्या चोख बंदोबस्तात मिरवणूक शांततेत पार
किनवट : ईद-ए-मिलादनिमित्त किनवट शहरात २६ ऑगस्ट बुधवार रोजी जुलूस-ए-मोहम्मदी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी आठ वाजता दारुल उलूम गरीब नवाज येथून मोठ्या उत्साहात या जुलूसला सुरुवात झाली. धार्मिक उत्साहाने भारलेल्या वातावरणात निघालेल्या या मिरवणुकीत उलमाए इक्राम यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. युवक, लहान मुले तसेच बालिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत जुलूसची शोभा वाढविली.
दारुल उलूम गरीब नवाज येथून सुरू झालेला जुलूस हबीब कॉलोनी, गांधी नगर, समता नगर, उमर चौक, सुभाष नगर, रजा चौक आदी प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत मोहम्मद अब्दुल रहेमान साहेब नक्शबंदी यांच्या निवासस्थानी पोहोचला. संपूर्ण मार्गावर नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. ‘लब्बैक रसूल अल्लाह, लब्बैक’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला, तर धार्मिक शब्दांचे सूर आणि घोषणांमुळे शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते.
धार्मिक विधीनंतर मान्यवरांचा सत्कार,मोहम्मद अब्दुल रहेमान साहेब नक्शबंदी यांच्या निवासस्थानी जुलूस पोहोचल्यानंतर धार्मिक विधी पार पडले. यानंतर मौलाना तैश रजा, मौलाना सगीर, हाफिज गालिब रजा (दारुल उलूम गरीब नवाज), किनवटचे मौलाना आसिफ तसेच माजी नगराध्यक्ष इसा खानसाब यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित नागरिकांसाठी परसात भोजन अर्थात लंगरचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने नागरिकांनी लंगरचा लाभ घेतला.
युवकांसह बालकांचाही उत्स्फूर्त सहभाग,जुलूस-ए-मोहम्मदीमध्ये विविध वयोगटातील नागरिकांनी सहभाग नोंदविला. विशेषतः युवक, लहान मुले आणि बालिकांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षवेधी ठरला. धार्मिक वातावरणात निघालेल्या या मिरवणुकीमुळे शहरात दिवसभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी किनवट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देवानंद फडेवार यांच्यासह पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मिरवणुकीच्या मार्गावर पोलिसांनी योग्य नियोजन करत परिस्थितीवर लक्ष ठेवले.
शांतता, धार्मिक उत्साह आणि बंधुभावाच्या वातावरणात जुलूस-ए-मोहम्मदी मिरवणूक पार पडली. मिरवणुकीच्या यशस्वी आयोजनामुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

