स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
श्रीकांत राऊत महागांव यवतमाळ
उमरखेड :-जिल्ह्यातील अवैध धंदे, अवैध उत्खनन व वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून, उमरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध पिवळी रेती वाहतूक करणारा टिप्पर जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईत सुमारे ४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
ईद-ए-मिलाद बंदोबस्त तसेच अवैध धंद्यांवर कारवाईच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात गस्त घालत होते. यावेळी उमरखेड ते ढाणकी रोडवरील एका फाट्याजवळ संशयास्पदरीत्या एक टिप्पर आढळून आला.
पोलिसांनी तपासणी केली असता टिप्परमधून विना रॉयल्टी चोरटी पिवळी रेती वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत टिप्पर क्रमांक MH-04-EL-5753 व त्यातील पिवळी रेती असा एकूण ४,०५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी सय्यद शाहिद सय्यद वहीद (वय २० वर्षे, रा. वॉर्ड क्रमांक १५, ढाणकी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) याच्याविरुद्ध उमरखेड पोलीस ठाण्यात कलम 303(2) भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 48(8) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा तसेच मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात स.पो.नि.धिरज बांडे, पोउपनि/अमोल राठोड, सफौ / मुन्ना आडे, सफौ/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोहवा/रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि/रविंद्र शिरामे, चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांचा वॉच कायम
जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. उमरखेडमधील या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
