विभागीय संपादक| निलेश रामगावकर
धामणगाव रेल्वे :- येथील से.फ.ला. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थी मंडळाची निवडणूक उत्साहात आणि लोकशाही पद्धतीने पार पडली. निवडणूक प्रत्यक्ष गोपनीय मतदान पद्धतीने घेण्यात आली असून विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
मिडल स्कूल विभागातून इयत्ता 5 वी ते 7 वी च्या अठरा वर्गांमधून अठरा वर्ग प्रतिनिधी निवडून आले. हायस्कूल विभागातून इयत्ता 8 वी ते 10 वी च्या 18 वर्गांमधून अठरा वर्ग प्रतिनिधी निवडून आले. तर कनिष्ठ महाविद्यालयातून विज्ञान विभागातून चार आणि कला विभागातून चार वर्ग प्रतिनिधी निवडून आले. प्रत्येक वर्गातील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून निकाल उत्कंठावर्धक होता. या निवडणुकीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेचे ज्ञान देण्यात आले.
निवडून आलेल्या सर्व वर्ग प्रतिनिधींमधून संमेलन कार्यवाह, संमेलन सहकार्यवाह व विद्यार्थिनी प्रतिनिधी ( GS, Vice-GS आणि LR ) पदासाठी निवडणूक घेण्यात आली.
GS पदी इयत्ता 12 वी कला शाखेचा विद्यार्थी यश पंकजराव ठाकरे याची 31 मते घेऊन निवड झाली.
Vice-GS पदी इयत्ता 10 वी फ चा विद्यार्थी प्रियांशु पंकज गायकवाड याची 30 मते घेऊन निवड झाली.
LR पदी इयत्ता 12 वी ब ची विद्यार्थिनी कु. सुहानी शंकर कोळमकर हिची निवड झाली.
नवनिर्वाचित सर्व वर्ग प्रतिनिधी, GS, Vice-GS व LR यांचे विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे, उपप्राचार्य प्रमोद हातेकर आणि पर्यवेक्षक नरेश कावलकर यांनी अभिनंदन केले. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख समीर हिरूळकर व मयुरी देशमुख उपस्थित होत्या.
नवनिर्वाचित मंडळाच्या सभेचे संचालन कैलास चौधर यांनी केले.
सभेला संबोधित करताना प्राचार्य प्रशांत शेंडे यांनी वर्ग प्रतिनिधींची वर्षभरातील जबाबदारी समजावून सांगितली. शिक्षक दिन, गणेशोत्सव व स्नेहसंमेलनात करावयाची कामे तसेच GS, Vice-GS व LR यांची वैयक्तिक जबाबदारी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
सदर निवडणूक प्राचार्य प्रशांत शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

