मोकाट कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; कानाला गंभीर दुखापत

 


सिंदगी (मो.) येथे मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ; बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

किनवट प्रतिनिधी : किनवट तालुक्यातील सिंदगी (मो.) येथे मोकाट कुत्र्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच २७ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे दोन वाजता सहा वर्षीय अन्वि बालाजी शिंदे या चिमुकलीवर मोकाट कुत्र्याने हल्ला करून तिच्या कानाला चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अन्वि ही नेहमीप्रमाणे आपल्या आजी आणि मोठ्या बहिणीसोबत घराच्या दाराजवळ बसून जेवण करत होती. जेवण झाल्यानंतर तिची मोठी बहीण पाणी पिण्यासाठी घरात गेली, तर आजीही काही कामानिमित्त घरात गेली. याच वेळी एक मोकाट कुत्रा अचानक अन्विजवळ आला आणि तिच्या कानाला चावा घेतला.


अचानक झालेल्या हल्ल्यामुळे अन्विने मोठ्याने आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकताच आजी व मोठी बहीण तातडीने घराबाहेर धावत आल्या. त्यांनी आरडाओरड करून कुत्र्याला हुसकावून लावल्याने कुत्र्याने तेथून पळ काढला. मात्र, या हल्ल्यात अन्विच्या कानाला गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.


रक्तस्राव थांबत नसल्याने अन्विला रक्तबंबाळ अवस्थेत तातडीने किनवट येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.


या घटनेनंतर सिंदगी (मो.) परिसरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गावातील विविध भागांत मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून, विशेषतः लहान मुले घराबाहेर खेळत असताना किंवा रस्त्याने ये-जा करताना त्यांच्या सुरक्षेबाबत पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.


एखादी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ग्रामपंचायतीने तातडीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन संबंधित प्रशासनाने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post