पत्नीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला १ वर्ष सश्रम कारावास; किनवट पोलिसांची प्रभावी कामगिरी

 




किनवट :  कौटुंबिक वादातून पत्नीवर काठीने हल्ला करून गंभीर दुखापत करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावास व द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात प्रभावी तपास करून भक्कम पुरावे सादर केल्याबद्दल किनवट पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १३ जानेवारी २०२६ रोजी मौजा पाधरा, ता. किनवट येथे कौटुंबिक वादातून आरोपी मारोती मोहनाजी टारपे याने स्वतःच्या पत्नी शाकुंतला मारोती टारपे यांना काठीने मारहाण करून गंभीर दुखापत केली होती. याप्रकरणी शाकुंतला टारपे यांच्या तक्रारीवरून किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ०७/२०२६ दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल श्री. पुरी यांनी करून आवश्यक पुरावे संकलित केले व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रकरणाची सुनावणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. पी. एम. माने यांच्या न्यायालयात झाली.

सरकार पक्षाचे पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी मारोती मोहनाजी टारपे याला भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील संबंधित कलमांखाली दोषी ठरवत प्रत्येक कलमान्वये एक वर्ष सश्रम कारावास तसेच ₹५,००० द्रव्यदंड अशी शिक्षा सुनावली.

या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता डि. ऐ. झाडे यांनी प्रभावी बाजू मांडली, तर कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस हेडकॉन्स्टेबल  वागतकर यांनी खटल्याचे कामकाज पाहिले.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात न्यायालयीन खटल्यांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रायल मॉनिटरिंग सेलमुळे अशा प्रकरणांमध्ये प्रभावी पाठपुरावा होत असून, महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये नांदेड पोलीस तत्पर व निष्पक्ष कारवाई करण्यास कटिबद्ध असल्याचा संदेश या निकालातून अधोरेखित झाला आहे.


या यशस्वी तपासाबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी किनवट पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, तपासी अधिकारी तसेच कोर्ट पैरवी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post