पैनगंगा पुलावर मृत्यूचा सापळा; संरक्षक कठडे गायब, अपघाताचा धोका वाढला

 




घाटंजी : विदर्भ, मराठवाडा आणि थेट तेलंगणाला जोडणारा घाटंजी–उनकेश्वर मार्गावरील पैनगंगा नदीवरील महत्त्वाचा पूल प्रशासकीय अनास्थेमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंचे संरक्षक कठडे गायब झाल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, मोठ्या अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.

या पुलावरून दिवस-रात्र शेकडो लहान-मोठ्या वाहनांची ये-जा सुरू असते. पूल आधीच अरुंद असल्याने समोरून येणाऱ्या वाहनाला पास देताना चालकांना मोठी कसरत करावी लागते. त्यातच दोन्ही बाजूंनी संरक्षक कठडे नसल्याने प्रत्येक प्रवास धोकादायक ठरत आहे.


विशेषतः रात्रीच्या वेळी, धुक्यात किंवा मुसळधार पावसात वाहनावरील नियंत्रण सुटल्यास वाहन थेट नदीपात्रात कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढेच नव्हे तर पुलावर धोक्याचा इशारा देणारे फलक, रेडियम इंडिकेटर किंवा इतर सुरक्षाविषयक उपाययोजनाही करण्यात आलेल्या नाहीत.


स्थानिक नागरिकांनी या गंभीर समस्येबाबत संबंधित प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला असला, तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता तातडीने पुलाच्या दोन्ही बाजूंना संरक्षक कठडे बसविण्यात यावेत, तसेच आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांकडून होत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post