तळेगाव दशासर, दि. ७ जुलै : ग्रामपंचायत तळेगाव दशासर येथे 'माझं गाव आरोग्यसंपन्न गाव' अभियानांतर्गत कृतिदल समितीची मासिक बैठक उत्साहात पार पडली.
बैठकीत मागील महिन्यात राबविण्यात आलेल्या विविध आरोग्यविषयक उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच चालू महिन्यात राबविण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक कार्यक्रमांची माहिती देऊन त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजन करण्यात आले.
यावेळी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलजन्य व कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. गावातील स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी उपाययोजना तसेच नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात आला.
यावेळी ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व माझं गाव आरोग्यसंपन्न गाव अभियान कृतिदल समितीचे सदस्य उपस्थित होते.

