भरड धान्य खरेदीची मुदत वाढविण्याची मागणी; अन्यथा १४ जुलैला 'ढोल बजाओ' आंदोलनाचा इशारा
किनवट | प्रतिनिधी
किनवट तालुक्यात भरड धान्य (ज्वारी) खरेदीची मुदत संपल्याने शेकडो शेतकरी अद्यापही ज्वारी विक्रीपासून वंचित राहिल्याचा आरोप करत शेतकरी संघटनेने खरेदीची मुदत तातडीने वाढविण्याची मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास १४ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता उपप्रादेशिक कार्यालय, आदिवासी विकास महामंडळ, किनवट येथे 'ढोल बजाओ' आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
शेतकरी संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, किनवट तालुक्यात ज्वारी खरेदीसाठी एकूण ७४१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. मात्र, आतापर्यंत केवळ २०७ शेतकऱ्यांकडूनच ज्वारी खरेदी करण्यात आली असून तब्बल ५३४ शेतकरी अद्यापही प्रतीक्षेत आहेत. सुमारे १० हजार क्विंटल ज्वारीची खरेदी झाली असून जवळपास १५ हजार क्विंटल ज्वारीची खरेदी अद्याप बाकी असल्याचा दावा करण्यात आला आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, ज्वारी खरेदी प्रक्रिया १ मे २०२६ पासून सुरू होणे अपेक्षित असताना ती प्रत्यक्षात २३ मे रोजी सुरू करण्यात आली. त्यामुळे खरेदी प्रक्रियेला सुरुवातीपासूनच विलंब झाला. तसेच ३० जून रोजी मुदत संपणार असल्याची माहिती असूनही मुदतवाढ मिळविण्यासाठी संबंधित विभागाने वेळेत पाठपुरावा केला नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
दरम्यान, बोधडी येथील शेतकरी दिनकर भाऊराव डोंगरे यांच्या ज्वारीची नोंदणी चुकून मका या पिकाखाली झाल्यामुळे त्यांना खरेदीचा संदेश मिळाला नाही. शेतकरी संघटनेच्या हस्तक्षेपानंतर नोंद दुरुस्त करण्यात आली असली, तरी खरेदीची मुदत संपल्याने सुमारे ३२ क्विंटल ज्वारीची विक्री होऊ शकली नाही. त्यामुळे सुमारे ६४ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान होणार असल्याचा दावा करण्यात आला असून, मुदतवाढ मिळाल्यास संबंधित शेतकऱ्यास नुकसानभरपाई देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
ही मागणी मान्य न झाल्यास १४ जुलै रोजी सकाळी १० वाजता 'ढोल बजाओ' आंदोलन करून शासन व संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे शेतकरी संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील यांनी स्पष्ट केले आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक तसेच पत्रकार व संपादकांना पाठविण्यात आल्या आहेत.

