जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर
देवळी : राज्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग व आंबिया बहारासाठी राबविण्यात येत आहे. मृग बहार सन २०२६-२७ अंतर्गत संत्रा, लिंबू, डाळिंब आणि हळद या पिकांसाठी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १४ जुलै २०२६ असून, सीताफळ पिकासाठी ३१ जुलै २०२६ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आपल्या फळपिकांचे संरक्षण करण्यासाठी वेळेत विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय कृषी विमा कंपनी (AIC) व कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत भारतीय कृषी विमा कंपनीतर्फे देवळी येथे "फसल विमा महिना" साजरा करण्यात येत असून, या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांनी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
यावर्षी वर्धा जिल्ह्यात द्राक्ष, संत्रा, डाळिंब, लिंबू, पेरू, चिकू आणि हळद या पिकांचा योजनेत समावेश करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे हळद या पिकाचा प्रथमच या योजनेत समावेश करण्यात आला असून, संबंधित पिकाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी विमा काढून घ्यावा, असे सांगण्यात आले.
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी होऊन नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानापासून आपल्या फळपिकांचे संरक्षण करावे आणि विहित मुदतीपूर्वी अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी ही योजना सुरू केली असून, १४ जुलै ही अंतिम मुदत लक्षात घेऊन पात्र शेतकऱ्यांनी विलंब न करता फळपीक विमा काढावा, असे आवाहन विभागीय व्यवस्थापक विशाल चौधरी आणि जिल्हा व्यवस्थापक शिवम सराफ यांनी केले आहे.
