आरोग्य आयुक्तांच्या आदेशालाही महागाव तालुक्यात हरताळ ?

 


आशा स्वयंसेविकांकडून अद्यापही BLO व SIR कामाची सक्ती ; आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची भीती 


 श्रीकांत राऊत यवतमाळ प्रतिनिधी 

महागाव : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविकांना BLO व SIR कामातून मुक्त करण्याबाबत आरोग्य सेवा आयुक्तांनी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवून स्पष्ट भूमिका मांडली असतानाही, महागाव तालुक्यात आशा स्वयंसेविकांकडून अद्यापही ही कामे करून घेतली जात असल्याचा आरोप पुढे आला आहे. आरोग्य विभागाने ६ जुलै २०२६ रोजी पाठविलेल्या पत्रात आशा स्वयंसेविकांवर माता-बाल संगोपन, लसीकरण, कुपोषण निर्मूलन, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे सर्वेक्षण यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असल्याने त्यांना निवडणूक कामांतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. तसेच BLO व SIR साठी इतर विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचाही पर्याय सुचविला आहे. मात्र, महागाव तालुक्यातील अनेक आशा स्वयंसेविकांना प्रशासनाकडून BLO व SIR संबंधित कामे करण्यासाठी तोंडी आदेश दिले जात असल्याची चर्चा आहे. यामुळे त्यांचे नियमित आरोग्यविषयक कामकाज विस्कळीत होत असून मानसिक ताणही वाढत असल्याचे सांगितले जात आहे. आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की, आरोग्य आयुक्तांनी स्पष्ट भूमिका घेतल्यानंतरही महागाव तालुक्यातील प्रशासन हे निर्देश गांभीर्याने का घेत नाही ? आशा स्वयंसेविकांकडून सक्तीने काम करून घेण्यामागे नेमके कोणाचे आदेश आहेत, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. प्रशासनाने याबाबत तातडीने भूमिका स्पष्ट करून आशा स्वयंसेविकांवरील अतिरिक्त भार कमी करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. महागाव तालुक्यातील आशा स्वयंसेविकांकडून BLO व SIR काम करून घेत असल्याच्या आरोपांबाबत महागावचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे या प्रकरणावर त्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Post a Comment

Previous Post Next Post