Maharashtra police | १२ वर्षांपासून फरार पोस्को प्रकरणातील आरोपीला बिहारमधून अटक; पाटण पोलिसांची धडाकेबाज कारवाई


Police



श्रीकांत राऊत | यवतमाळ
पाटण : पाटण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मिलिंद सरकटे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने तब्बल १२ वर्षांपासून फरार असलेल्या पोस्को व बलात्कार प्रकरणातील आरोपीला बिहार राज्यातून शिताफीने ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे.
पाटण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात तसेच केळापूर येथील विशेष पोस्को न्यायालयातील प्रकरण क्रमांक ५/२०१४ मध्ये आरोपी दीर्घकाळ न्यायालयात हजर राहत नव्हता. त्याच्याविरुद्ध न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट (NBW) जारी केले होते.
या वॉरंटच्या अंमलबजावणीसाठी प्रभारी अधिकारी मिलिंद सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मुकेश करपते, पोलीस शिपाई सचिन बोंडे, संदीप नामेकर आणि महिला पोलीस शिपाई ज्योती तपासे यांचे विशेष पथक खासगी वाहनाने बिहारला रवाना झाले.
तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने आरोपीचा शोध घेत त्याला झोपेत असतानाच अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीला सुरक्षितपणे महाराष्ट्रात आणून केळापूर न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत यवतमाळ जिल्हा कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.
ही कारवाई यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि वणी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पथकाशी सातत्याने समन्वय साधून आवश्यक सूचना देत कारवाईचे प्रभावी नियोजन करण्यात आले.
पाटण पोलिसांनी दाखविलेले धाडस, अचूक नियोजन आणि समन्वय यामुळे १२ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात यश मिळाले असून या कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.






Post a Comment

Previous Post Next Post