प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार; आरोग्य सभापती ज्योत्सनाताई धवसे यांचा ठाम निर्धार

 

अमरावती

जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर 

नांदगाव खंडेश्वर : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य वर्धिनी केंद्र, नांदगाव खंडेश्वर येथे आरोग्य समितीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगरपंचायतीच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षा तथा आरोग्य सभापती सौ. ज्योत्सनाताई अमोल धवसे होत्या.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून बैठकीची सुरुवात करण्यात आली. यावेळी आरोग्य सभापती ज्योत्सनाताई धवसे यांनी नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत, आरोग्य वर्धिनी केंद्रामार्फत रुग्णांना दर्जेदार उपचार, योग्य सुविधा व तत्पर आरोग्य सेवा मिळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

यावेळी त्या म्हणाल्या, "नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार व प्रभावी आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत." तसेच शहरातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती वाढविणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविणे आणि शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

यावेळी नगरपंचायतीचे गटनेते प्रकाश मारोटकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राजक्ता वानखडे, आरोग्य वर्धिनी केंद्राच्या डॉ. स्नेहल धवणे, महिला व बालकल्याण पर्यवेक्षिका वर्षा मोरे, आरोग्य विभागाचे प्रतिनिधी कमल धुर्वे, रामचंद्र गायकवाड, हर्षाताई फुटाणे, विष्णू राऊत, आशा सेविका कांताताई इंगोले, नलिनीताई हत्तीमारे, शालिनीताई कराळे, तसेच प्रतिष्ठित नागरिक अंबादास बोके आदी उपस्थित होते.

बैठकीत आरोग्य विभागाच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नांदगाव खंडेश्वरच्या नागरिकांना अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण व लोकाभिमुख आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपंचायत प्रशासन व सार्वजनिक आरोग्य विभाग समन्वयाने कार्य करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post