Grampanchayatnews | ग्रामपंचायतीचे लेटरपॅड, शिक्का आणि कथित बनावट स्वाक्षरी; मग वृक्षतोडीचा परवाना नक्की तयार कोणी केला

 



जिल्हा प्रतिनिधी | निलेश रामगावकर

धामणगाव रेल्वे, तळेगाव दशासर : ग्रामपंचायतीच्या अधिकृत लेटरपॅडवर, अधिकृत शिक्क्याचा वापर करून आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कथित बनावट स्वाक्षरीच्या आधारे वृक्षतोडीचा परवाना तयार झाल्याचा गंभीर संशय व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, 'गावाकडची बातमी' टीमने या संदर्भात ग्रामपंचायत सचिव काळमेघ यांच्याशी संपर्क साधला असता, "सदर स्वाक्षरी माझी नाही. ती बनावट आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

या प्रतिक्रियेमुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले असून, जर संबंधित स्वाक्षरी खरोखरच सचिवांची नसेल, तर ग्रामपंचायतीचे अधिकृत लेटरपॅड व शिक्का कोणाच्या ताब्यात होता? त्यांचा वापर कोणी केला? कथित परवाना कोणी तयार केला? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

यासोबतच ग्रामपंचायतीतील अधिकृत कागदपत्रांच्या सुरक्षिततेबाबतही गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत. कार्यालयातील लेटरपॅड आणि शिक्क्याचा गैरवापर झाला का? कार्यालयीन नियंत्रणात त्रुटी होत्या का? की हा प्रकार जाणूनबुजून घडविण्यात आला? याची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

संबंधित सचिवांनी स्वाक्षरी नाकारल्याने कथित परवान्याची सत्यता, दस्तऐवजांची न्यायवैद्यकीय (फॉरेन्सिक) तपासणी आणि दोषींवर कायदेशीर कारवाईची मागणी अधिक जोर धरू लागली आहे. या प्रकरणात सत्य काय आहे, याचा उलगडा तपासानंतरच होणार असला तरी प्रशासनाने या गंभीर प्रश्नांची तातडीने दखल घेणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.

  ग्रामपंचायत कार्यालय तळेगाव दशासर सचिव काळमेघ यांची प्रतिक्रिया :

"सदर स्वाक्षरी माझी नाही. ती स्वाक्षरी बनावट आहे."







Post a Comment

Previous Post Next Post