वनहक्कधारक आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेत राजूभाऊ तोडसाम यांचा ठाम आवाज




मुंबई / यवतमाळ : वनहक्कधारक आदिवासी बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळावा आणि वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांनी महाराष्ट्र विधानसभेत ठामपणे आवाज उठवला.

विधानसभेत बोलताना त्यांनी वनपट्टे मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या जमिनीची तातडीने मोजणी करून त्याची भूमी अभिलेखात नोंद करण्याची मागणी केली. तसेच वन व महसूल विभागातील विसंगती दूर करून पात्र लाभार्थ्यांना वनहक्कांचा लाभ विनाविलंब मिळावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय वनहक्क समित्यांना अधिक सक्षम करून वनपट्टा वितरण प्रक्रिया पारदर्शक, सुलभ आणि वेळेत पूर्ण करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. यवतमाळसह राज्यातील आदिवासीबहुल जिल्ह्यांतील वनहक्कधारकांना न्याय मिळण्यासाठी शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणीही त्यांनी सभागृहात केली.

वनहक्कधारक आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि वनहक्कांचे संरक्षण ही शासनाची तसेच समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत, या विषयावर तातडीने प्रभावी कार्यवाही करण्याचे आवाहन त्यांनी सरकारला केले.

वनहक्कधारक आदिवासींच्या न्याय्य हक्कांसाठी विधानसभेत मांडण्यात आलेल्या या भूमिकेचे आदिवासी समाजातून स्वागत होत असून, शासन आता याबाबत कोणते ठोस निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Post a Comment

Previous Post Next Post