ग्रामपंचायत मुंडगाव येथील सरपंच व ग्रामसेवकांचे दुर्लक्ष; मंदिर व शाळा परिसरात घाणीचे साम्राज्य


Grampanchayat


मुंडगाव | प्रतिनिधी

ग्रामपंचायत मुंडगाव येथील सरपंच मिनाबाई उईके व ग्रामसेवक सय्यद नजाकत यांच्या कथित दुर्लक्षामुळे गावात सांडपाणी साचून अस्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण झाली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विशेष म्हणजे मंदिर व शाळेच्या परिसरातही घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावातील सांडपाण्याची योग्य निचरा व्यवस्था नसल्याने अनेक ठिकाणी पाणी साचत असून दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याबाबत वारंवार तोंडी तसेच लेखी निवेदने देऊनही ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यामुळे संतप्त नागरिकांनी गावातील रस्ते व सांडपाणी व्यवस्थेची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते रितेश कडू यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधितांवर योग्य कारवाई करावी तसेच गावातील स्वच्छता, सांडपाणी निचरा आणि रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तात्काळ सुरू करावीत, अशी मागणी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post