जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर
अमरावती : अमरावती येथे शासकीय आश्रमशाळांच्या प्रशिक्षणादरम्यान दलित पँथरचे जिल्हाध्यक्ष प्रेम थॉमस यांनी आश्रमशाळांच्या कारभारावर गंभीर आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांना व मुख्याध्यापकांना जाब विचारला. एप्रिल २०२६ मध्ये माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागविलेली माहिती अद्याप देण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रेम थॉमस यांनी टिटंबा येथील मुख्याध्यापक साबळे, रायपूर येथील मुख्याध्यापक चौधरी तसेच बिजूधावडी येथील मुख्याध्यापक यांच्यावर माहिती न दिल्याचा आरोप करत प्रशिक्षणस्थळी त्यांना खडेबोल सुनावले.
यापूर्वी मेळघाटातील शासकीय आश्रमशाळांना भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना खाज-खुजलीचा त्रास होत असल्याचे तसेच पोषण आहारामध्ये लाल चटणी व शिळी भाकरी दिली जात असल्याचे आपण प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा प्रेम थॉमस यांनी केला. याबाबत बिजूधावडी येथील मुख्याध्यापकांना त्यांनी जाब विचारत, "हा कोणता पोषण आहार आहे?" असा सवाल उपस्थित केला.
विद्यार्थ्यांना योग्य उपचार व दर्जेदार पोषण आहार न देता त्यांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. प्रशिक्षणादरम्यान मुख्याध्यापक साबळे, चौधरी, हरणे व इतरांशी शाब्दिक वाद झाल्याचे सांगत, "तुम्ही शिक्षक आहात, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका," असे त्यांनी स्पष्टपणे सुनावले.
यावेळी मुख्याध्यापक साबळे यांनी "आम्ही बघून घेऊ," असे म्हटल्याचा दावा प्रेम थॉमस यांनी केला. त्यावर प्रत्युत्तर देताना, "फक्त तुम्हालाच नव्हे तर संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरले जाईल. मेळघाटातील शासकीय आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांसोबत कोणतीही अनुचित घटना घडल्यास मी गप्प बसणार नाही," असा इशारा त्यांनी दिला.
मेळघाटातील सर्व आदिवासी नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दलित पँथरचे जिल्हाध्यक्ष प्रेम थॉमस यांनी दिला आहे.
