यवतमाळ रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य रस्त्याची दुरवस्था; मोठ्या पुलाजवळील खड्ड्यामुळे अपघाताचा धोका




तालुका ग्रामीण प्रतिनिधी शुभम मेश्राम 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील विराज हॉटेल (यवतमाळ रोड) ते बस स्टॉप, मोठा पूल, तहसील कार्यालय आणि न्यायालयापर्यंतचा मुख्य रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. विशेषतः मोठ्या पुलाजवळ डिव्हायडरलगत पडलेला मोठा खड्डा नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे.

सध्या सुरू असलेल्या पावसामुळे हा खड्डा पाण्याखाली झाकला जात असल्याने वाहनचालकांना तो दिसत नाही. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली असून नागरिकांनी याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्याबाबत वारंवार तक्रारी करण्यात येतात. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जाते. कायमस्वरूपी डांबरीकरण करून खड्डे बुजविण्याऐवजी थातूरमातूर दुरुस्ती केली जात असल्याने काही दिवसांतच रस्ता पुन्हा पूर्ववत खराब होतो.

विशेष म्हणजे, तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय असून या मार्गाने विभागाचे अधिकारी व कर्मचारी दररोज ये-जा करतात. तरीही रस्त्याची दुरवस्था आणि जीवघेणे खड्डे त्यांच्या निदर्शनास येत नसल्याचे चित्र दिसत आहे.

दररोज हजारो नागरिक, वकील, पक्षकार, शासकीय कर्मचारी, विद्यार्थी आणि वाहनचालक तहसील कार्यालय व न्यायालयाकडे ये-जा करतात. त्यामुळे या मार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ कायमस्वरूपी दर्जेदार डांबरीकरण करून रस्ता सुरक्षित करावा, अन्यथा एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post