औसा (लातूर) | प्रतिनिधी
औसा तालुक्यातील भादा गावातील शेतशिवारात शेतीला थ्री-फेज वीजपुरवठा करणारे रोहित्र गेल्या पंधरा दिवसांपासून जळाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आधीच मृग नक्षत्रापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. त्यात सिंचनासाठी आवश्यक असलेला वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकरी चिंतेत होते.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित यंत्रणेकडे वारंवार पाठपुरावा करूनही रोहित्र बदलण्याबाबत टाळाटाळ केली जात होती. कोणतीही दखल घेतली जात नव्हती. अखेर भादा येथील शेतकरी गोविंद पाटील यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार रमेश अप्पा कराड यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून शेतकऱ्यांची अडचण सांगितली.
शेतकऱ्यांची समस्या समजताच आमदार रमेश अप्पा कराड यांनी तात्काळ संबंधित वीज वितरण यंत्रणेशी संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर अवघ्या एका तासाच्या आत नवीन रोहित शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले.
"पंधरा दिवसांपासून आम्ही रोहित्रासाठी हेलपाटे मारत होतो. आमदार साहेबांना फोन करून अडचण सांगितली आणि अवघ्या एका तासात आमचे काम झाले," अशी प्रतिक्रिया शेतकरी गोविंद पाटील यांनी दिली.
शेतकऱ्यांची अडचण तातडीने सोडवल्याबद्दल आमदार रमेश अप्पा कराड यांचे भादा परिसरातील शेतकऱ्यांकडून कौतुक होत असून, त्यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी घेतलेल्या दखलीमुळे शेतकऱ्यांना वेळेवर रोहित्र उपलब्ध झाले..
त्यामुळे शेतकऱ्यांना कडून समाधान व्यक्त केले जात आहे..
