नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथील सामाजिक कार्यकर्ते एजाज बागवान यांना राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने 'समाज रत्न' पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीचा २७ वा वर्धापन दिन नुकताच छत्रपती संभाजीनगर येथील भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या १११ मान्यवरांना 'समाज रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी मराठवाडा विभागाचे परिवहन अधिकारी विजय काठोळे यांच्या हस्ते एजाज बागवान यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमास सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख, मनपाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती मोहिनी, राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद साबेर, खुलताबादचे नगराध्यक्ष आमीर पटेल, मराठवाडा विभागाध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
एजाज बागवान यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे.
