जिल्हा प्रतिनिधी | निलेश रामगावकर
धामणगाव रेल्वे तालुक्यातील गव्हाणीपाणी येथील गावठाणालगतच्या ई-वर्ग जमीन सर्वे क्रमांक २९१ वरील अतिक्रमणधारकांना कायदेशीर पट्टे देऊन त्यांच्या वास्तव्यास नियमित मान्यता द्यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्या पूजा विनोद कुर्जेकर यांनी आमदार प्रताप अडसड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, गावातील अनेक कुटुंबे गेल्या सुमारे ८० वर्षांपासून ई-वर्ग जमिनीवर वास्तव्यास आहेत. या परिसरात ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींच्या निधीतून पक्के रस्ते, नाल्या, वीज, पाणीपुरवठा यांसह विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. काही लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला असून अनेकांनी पक्की व दुमजली घरे उभारली आहेत. काही कुटुंबांच्या दोन पिढ्या याच ठिकाणी राहत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मात्र, प्रशासनाकडून अतिक्रमणाचे नियमन अद्याप झाले नसल्याने संबंधित कुटुंबांच्या नावावर नमुना ८-अमध्ये नोंदी झालेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना मालकी हक्कापासून वंचित राहावे लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या संदर्भात ग्रामपंचायतीने २४ मार्च २०२३ रोजी तहसील कार्यालय, धामणगाव रेल्वे येथे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर तो उपविभागीय अधिकारी, चांदूर रेल्वे यांच्याकडेही पाठविण्यात आला. मात्र, अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गावातील जवळपास अर्धी लोकसंख्या या परिसरात वास्तव्यास असल्याने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून ई-वर्ग जमिनीवरील पात्र अतिक्रमणधारकांना कायदेशीर पट्टे वाटप करण्यात यावेत, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्या पूजा विनोद कुर्जेकर यांनी आमदार प्रताप अडसड यांच्याकडे केली आहे.
