Kurha police | कुऱ्हा पोलीस ठाणे हद्दीतील थरारक घटना; तरुणीवर पेट्रोल टाकून हत्येचा प्रयत्न

 

Amaravati, police station kurha


तक्रार मागे न घेतल्याने तरुणीवर पेट्रोल टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न; अमरावती ग्रामीणमधील धक्कादायक घटना


जिल्हा प्रतिनिधी/निलेश रामगावकर 

अमरावती,कु-हा : धामणगांव रेल्वे पूर्ववैमनस्यातून दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी एका १९ वर्षीय तरुणीला धमकावून, तिच्यावर पेट्रोल फेकून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना अमरावती ग्रामीणमधील कुऱ्हा पोलीस स्टेशन अंतर्गत उघडकीस आली आहे. याप्रकरणी कुऱ्हा पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंग आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केल्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक विलास ताठे (वय २५, रा. महेंद्र कॉलनी, ता. जि. अमरावती) असे आरोपीचे नाव आहे. ११ जुलै २०२६ रोजी दुपारी १२:१५ ते १२:२५ च्या दरम्यान ही घटना घडली. घटनेच्या वेळी १९ वर्षीय फिर्यादी तरुणीचे आई-वडील लग्नासाठी बाहेरगावी गेले होते, तर घरातील इतर सदस्यही बाहेर होते. तरुणी घरात कपडे धुवत असताना आरोपी प्रतीक ताठे याने घराबाहेरून आवाज देऊन तिला बाहेर बोलावले. तरुणीने दरवाजा उघडला असता आरोपीने तिला आधी दाखल केलेला गुन्हा (गु.र.नं. १३४/२०२६) मागे घेण्यास सांगितले. "तू माझ्याविरुद्ध दिलेली तक्रार मागे घे, मी तुझ्यासोबत लग्न करतो," असे आरोपी म्हणाला. त्यावर तरुणीने "मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही आणि केस देखील मागे घेणार नाही," असे स्पष्ट उत्तर दिले. याचा राग येऊन आरोपी प्रतीकने तरुणीला जबरदस्तीने पकडले, ज्यामध्ये तिचे कपडे फाटले. एवढ्यावरच न थांबता आरोपीने स्वतःजवळील पेट्रोलची बॉटल काढून ते पेट्रोल फिर्यादी तरुणीच्या अंगावर फेकले आणि खिशातील माचिस काढली.

या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तरुणीचा आवाज ऐकून तिचे शेजारी आणि चुलत भाऊ धावून आले. लोकांना येताना पाहून आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. याप्रकरणी पीडित तरुणीच्या जबानी रिपोर्टवरून कुऱ्हा पोलिसांनी आरोपी प्रतीक विलास ताठे याच्याविरुद्ध गु.र.नं. २५३/२६, कलम १०९, ३५१(२), ३५२, ७४, ७६ (बीएनएस) आणि ३०७, ३५४, ३५४(ब), ५०४, ५०६ (भादंवि) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post