हरित क्रांतीचे प्रणेते, विकासद्रष्टे लोकनेते वसंतरावजी नायक
आजच्या राजकारणाला दिशा देणारे नेतृत्व
महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेक महान नेत्यांनी आपले मोलाचे योगदान दिले. परंतु ग्रामीण विकास, शेती, जलसंधारण, शिक्षण आणि सर्वसमावेशक प्रशासनाचा विचार केला तर स्वर्गीय वसंतरावजी नायक यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. १ जुलै हा त्यांचा जन्मदिन केवळ जयंती नसून महाराष्ट्राच्या विकासदृष्टीचा आणि शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचा दिवस आहे.
वसंतरावजी नायक यांनी ५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५ या कालावधीत सलग साडेअकरा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून यशस्वी नेतृत्व केले. लोकशाही व्यवस्थेत एवढ्या प्रदीर्घ काळ मुख्यमंत्रीपदावर राहणे ही साधी गोष्ट नाही. त्यामागे त्यांची स्वच्छ प्रतिमा, विकासाभिमुख धोरणे, लोकांमधील विश्वास, प्रशासनावरील पकड आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची कार्यशैली होती. आजही महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा मान त्यांच्याकडे आहे. त्यांच्या कार्यकाळाकडे आजही अनेक जण "सुवर्णकाल" म्हणून पाहतात.
त्यांनी शेतीला उद्योगाचे स्वरूप देण्याचा दूरदृष्टीचा विचार मांडला. दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला सक्षम करण्यासाठी सिंचन, जलसंधारण, सुधारित बियाणे, रासायनिक खतांचा वापर, आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषी संशोधन आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण यावर त्यांनी विशेष भर दिला. याच धोरणांमुळे महाराष्ट्रात हरित क्रांतीचा पाया रचला गेला आणि त्यांना "हरित क्रांतीचे प्रणेते" म्हणून ओळख मिळाली.
विदर्भ, मराठवाडा आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक संशोधनाचा लाभ मिळावा म्हणून कृषी शिक्षणाला त्यांनी मोठे प्रोत्साहन दिले. त्यांच्या कार्यकाळात कृषी विद्यापीठांच्या उभारणीला गती मिळाली. आज महाराष्ट्रातील विविध कृषी विद्यापीठे शेतकऱ्यांसाठी संशोधन, तंत्रज्ञान आणि नव्या पद्धती विकसित करून शेतीला बळ देत आहेत. हा त्यांच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे.
त्यांच्या कार्यकाळात रोजगाराभिमुख धोरणे, ग्रामीण रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आदिवासी विकास, मागासवर्गीयांचे कल्याण आणि गरीब घटकांसाठी अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, हा त्यांचा कायम आग्रह होता.
वसंतरावजी नायक यांचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची राजकीय संस्कृती. विरोधी पक्ष हा शत्रू नसून लोकशाहीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे, अशी त्यांची ठाम भूमिका होती. विधानसभेत विरोधी पक्षाच्या सूचना शांतपणे ऐकून घेणे, योग्य सूचना स्वीकारणे आणि सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेणे ही त्यांची कार्यपद्धती होती. मतभेद असले तरी मनभेद नसावेत, हा संदेश त्यांनी आपल्या आचरणातून दिला.
आजच्या राजकारणात अनेकदा आरोप-प्रत्यारोप, वैयक्तिक टीका, द्वेष आणि संघर्ष दिसून येतो. अशा काळात वसंतरावजी नायक यांचे व्यक्तिमत्त्व अधिकच प्रेरणादायी ठरते. त्यांनी विकासाला राजकारणापेक्षा मोठे स्थान दिले. सत्ता आली तर जनतेसाठी काम करणे आणि विरोधकांनाही राज्यहिताच्या कामात सहभागी करून घेणे, हीच खरी लोकशाही असल्याचे त्यांनी कृतीतून दाखवून दिले.
आजच्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या जीवनातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. सत्तेचा दिखावा न करता विकासाची स्पर्धा करणे, शेतकरी आणि सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवणे, शिक्षण आणि संशोधनाला प्राधान्य देणे, विरोधकांचा आदर राखणे, स्वच्छ चारित्र्य जपणे आणि समाजहिताला सर्वोच्च मानणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
आज महाराष्ट्र अनेक नवीन आव्हानांना सामोरे जात आहे. हवामान बदल, पाण्याची टंचाई, शेतीचे वाढते संकट, बेरोजगारी आणि सामाजिक विषमता यावर मात करण्यासाठी वसंतरावजी नायक यांच्या विकासदृष्टीची आज अधिक आवश्यकता आहे.
त्यांच्या जयंतीनिमित्त आपण केवळ अभिवादन करून थांबू नये, तर त्यांच्या विचारांचा स्वीकार करून समाजहित, शेतकरीहित आणि लोकहिताची वाट चालण्याचा संकल्प करूया. हाच त्यांच्या कार्याला आणि स्मृतीला सर्वात मोठा मानाचा मुजरा ठरेल.
हरित क्रांतीचे शिल्पकार, विकासद्रष्टे लोकनेते, शेतकऱ्यांचे खरे कैवारी आणि महाराष्ट्राच्या प्रगतीचे आधारस्तंभ स्वर्गीय वसंतरावजी नायक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
– रामराव मेघावत
केसुला हवेली, गोकुंदा, ता. किनवट
