सेवाभाव, संघर्ष आणि समाजसेवेचा प्रेरणादायी संगम; श्री संत फुलाजी बाबा आदिवासी कर्मचारी बचत गटातर्फे सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

 




किनवट | प्रतिनिधी

किनवट येथील श्री संत फुलाजी बाबा आदिवासी कर्मचारी बचत गटाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय सेवा बजावून सेवापूर्ती गाठलेल्या मान्यवरांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला. आयुष्यभर समाजासाठी आणि शासकीय सेवेसाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करत उपस्थितांनी सत्कारमूर्तींना उभे राहून मानवंदना दिली.

यावेळी प्रा. विजयराव खुपसे, उत्तमराव नखाते, प्रकाशराव गुहाडे आणि माधवराव भायमारे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी खुडे सर यांनी प्रभावी प्रस्ताविकातून "सेवापूर्ती म्हणजे नोकरीचा शेवट नसून समाजसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात" असल्याचे सांगितले. त्यानंतर शेळके सर यांनी सत्कारमूर्तींच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सेवाभावी जीवनप्रवासाला उजाळा दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तमराव धुमाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शंकरराव फोले, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महिला प्रदेशाध्यक्ष नंदिनीताई टारपे आणि डॉ. पिंपरे उपस्थित होते. तसेच मेटकरे सर, डॉ. सुभाष वानोळे, युवराज डवरे सर, डॉ. भुरके यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून मनोगत व्यक्त केले.

सत्काराला उत्तर देताना प्रा. विजयराव खुपसे यांनी आपल्या संघर्षमय जीवनप्रवासातील अनेक प्रेरणादायी आठवणी सांगितल्या. शिक्षणासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत किनवट येथे भाजीपाला विकून शिक्षणाचा खर्च भागविल्याचे त्यांनी सांगितले. आईच्या अथक परिश्रमांमुळे शिक्षण पूर्ण करता आले, तर उच्च शिक्षणासाठी भावांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे प्राध्यापक होण्याचे स्वप्न साकार झाल्याचे त्यांनी नमूद केले. समाजकार्यासाठी मिळालेली प्रेरणा, वडिलांचे संस्कार आणि आमदारकीच्या निवडणुकीत मिळालेले सहकार्य याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

सेवानिवृत्त कृषी अधिकारी उत्तमराव नखाते यांनीही आपल्या जीवनप्रवासाला उजाळा देताना आदिवासी आश्रमशाळेत शिक्षण घेतल्यानंतर ज्या विभागात कर्मचारी म्हणून काम केले, त्याच विभागात पुढे अधिकारी म्हणून सेवा करण्याची संधी मिळाल्याचे सांगितले. मेळघाटातील आदिवासी बांधवांमध्ये काम करताना प्रामाणिकपणा जपला आणि आयुष्यात कधीही कोणाकडून कामासाठी पैशाची किंवा चहाची अपेक्षा केली नाही, असे सांगत त्यांनी निःस्वार्थ सेवाभावाचे महत्त्व अधोरेखित केले.

प्रकाशराव गुहाडे यांनी सत्कारासाठी बचत गटाचे आभार मानले.

प्रमुख पाहुणे शंकरराव फोले यांनी सेवापूर्ती म्हणजे विश्रांती नव्हे, तर समाजसेवेची नवी जबाबदारी असल्याचे सांगत उर्वरित आयुष्य समाजाच्या उन्नतीसाठी समर्पित करण्याचे आवाहन केले.

नंदिनीताई टारपे यांनी सेवापूर्तीनंतरही शिक्षण, सामाजिक न्याय, संघटन आणि आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्रिय राहण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय समारोपात डॉ. उत्तमराव धुमाळे यांनी सेवापूर्ती हा शेवट नसून अनुभवाच्या बळावर समाजाला दिशा देण्याचा नवा अध्याय असल्याचे सांगत सर्व सत्कारमूर्तींचे अभिनंदन केले.

संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आदिवासी नेते गोपीनाथ बुलबुले यांनी केले, तर मेटकरे सर यांनी उपस्थित मान्यवर, आयोजक आणि सर्व उपस्थितांचे आभार मानले.

या प्रेरणादायी सेवापूर्ती सत्कार सोहळ्यास कर्मचारी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघर्ष, सेवाभाव आणि समाजकार्यातील योगदानाचा गौरव करणारा हा सोहळा उपस्थितांच्या मनात कायमस्वरूपी स्मरणात राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post