उपसंपादक संतोष भालेराव
अमरावती : अचलपूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मनमानी कारभाराविरोधात पुन्हा एकदा गंभीर आरोप समोर आले आहेत.ग्रामपंचायत कांडली येथील रहिवासी गोविंद रूपलाल मोहितीरे यांनी आपल्या खासगी मालकीच्या प्लॉटमध्ये कोणतीही पूर्वसूचना, लेखी संमती (NOC) अथवा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणीपुरवठ्याची पाइपलाइन टाकून चेंबर बांधल्याचा गंभीर आरोप केला आहे.
यासंदर्भात त्यांनी उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अचलपूर यांच्याकडे लेखी हरकत नोंदवून संबंधित बेकायदेशीर बांधकाम तात्काळ हटवून जागा पूर्ववत करण्याची तसेच दोषी अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अर्जदाराच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या खासगी मालमत्तेत प्रवेश करून काम करण्यासाठी कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नाही. तसेच जमीन वापरण्याचा अधिकार (Right of User), लेखी संमती, प्रशासकीय मंजुरी, तांत्रिक मंजुरी किंवा इतर आवश्यक कायदेशीर कागदपत्रांची माहितीही त्यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या घटनात्मक मालमत्ता हक्कांचे उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अचलपूरच्या कार्यपद्धतीबाबत यापूर्वीही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अचलपूर पंचायत समिती अंतर्गत पांढरी ग्रामपंचायत क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल ८ किलोमीटर अंतरावरील गौरखेडा कुंभी ग्रामपंचायत हद्दीत पाण्याची टाकी उभारून तेथून पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचा तसेच हा पाणीपुरवठा आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणामुळेही जीवन प्राधिकरणाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
गोविंद मोहितीरे यांनी दिलेल्या निवेदनात, ७ दिवसांच्या आत खासगी जागेतील पाइपलाइन व चेंबर हटवून जागा पूर्ववत करावी, अन्यथा जिल्हाधिकारी, मुख्य अभियंता, पोलीस प्रशासन तसेच सक्षम दिवाणी व फौजदारी न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.
या प्रकरणामुळे सार्वजनिक कामांच्या नावाखाली नागरिकांच्या खासगी मालमत्तेवर अतिक्रमण करून कामे केली जात आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत असून, संबंधित विभागाने या गंभीर आरोपांवर तातडीने स्पष्टीकरण देऊन वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी होत आहे.
