श्रीमद्भगवद्गीता भेट देऊन अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा

 

Maharashtra, pune

मुळशी (पुणे) : प्रतिनिधी

मुळशी तालुक्यातील भालगुडी येथील युवा उद्योजक महेंद्रभाऊ साठे यांचा वाढदिवस पारंपरिक हिंदू पद्धतीने औक्षण करून तसेच श्रीमद्भगवद्गीता व ज्ञानेश्वरी गाथेचे वाचन करत साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना श्रीमद्भगवद्गीता आणि गाथा भेट देऊन समाजासमोर एक प्रेरणादायी संदेश देण्यात आला.

भारतीय संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि पुढील पिढीपर्यंत तिचा वारसा पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. उपस्थितांनी श्रीमद्भगवद्गीतेतील विचारांचे वाचन, मनन आणि चिंतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच ज्ञानेश्वरी, गीता, गाथा यांसारखे संतवाङ्मय प्रत्येक घरापर्यंत पोहोचावे आणि संतांच्या विचारांवर आधारित समाज घडावा, असे मत व्यक्त करण्यात आले.

हा उपक्रम भारत गौरव पुरस्कार प्राप्त कवीभूषण विठ्ठल दळवी (मावळ, पुणे) यांच्या पुढाकाराने त्यांच्या राहत्या घरी आयोजित करण्यात आला. वाढदिवस साजरा करण्याची ही आगळीवेगळी संकल्पना समाजासाठी आदर्श ठरावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.

यावेळी उपस्थितांनी वाढदिवसानिमित्त फुले, हार किंवा इतर भेटवस्तूंऐवजी श्रीमद्भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, गाथा यांसारखे ग्रंथ तसेच किमान एक तरी वृक्ष भेट देण्याचे आवाहन केले. वड, पिंपळ, चिंच यांसारख्या ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनात सहभागी होण्याचेही आवाहन करण्यात आले.

हिंदू संस्कृती, संत साहित्य, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक मूल्यांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने अशा प्रकारचे उपक्रम समाजात अधिक प्रमाणात राबविण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post