निलेश रामगावकर जिल्हा प्रतिनिधी
धामणगाव रेल्वे :- सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात नवीन शैक्षणिक सत्राच्या प्रारंभी विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती व्हावी तसेच सुरक्षित डिजिटल वापराची सवय लागावी, या उद्देशाने सायबर सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी आर्थिक फसवणूक, ऑनलाईन व्यवहारांमध्ये घ्यावयाची खबरदारी, अनोळखी व्यक्तींशी संपर्क टाळणे, सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे व कुटुंबाचे संरक्षण करण्याचे उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अशा फसवणुकीमुळे पालकांना होणारा मानसिक व आर्थिक त्रास याविषयी विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले.
मुख्य मार्गदर्शक म्हणून धामणगाव रेल्वे पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री गजानन गजभारे यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, त्यापासून बचावाचे उपाय तसेच जबाबदार नागरिक म्हणून सोशल मीडियाचा वापर करण्याचे महत्त्व पटवून दिले. यावेळी पीएसआय कदम मॅडम यांनी अल्पवयीन मुलींची सुरक्षितता, स्वतःचे संरक्षण, तसेच लैंगिक अत्याचार, मुलींची छेडछाड आणि पोक्सो कायदा अंतर्गत असलेल्या तरतुदींची माहिती विद्यार्थिनींना दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रशांत शेंडे उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक नरेश कावलकर यांनी केले. सूत्रसंचालन कु. आरती भांगे यांनी तर आभार प्रदर्शन सुशील नागपूरे यांनी केले.
विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सायबर सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचा संकल्प केला.
