अनुसूचित जातीतील आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करा; रिपाइंचे कोल्हापुरात 'रस्ता रोको' आंदोलन

 




कोल्हापूर | प्रतिनिधी

अनुसूचित जाती (SC) आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शवत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वतीने कोल्हापुरात मंगळवारी तावडे हॉटेल चौकात 'रस्ता रोको' आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने अनुसूचित जातीतील ५९ जातींचे उपवर्गीकरण करण्याचा निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

१ ऑगस्ट २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर महाराष्ट्र शासनाने माजी न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून अनुसूचित जातींचे 'अ', 'ब', 'क' आणि 'ड' अशा गटांमध्ये उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या निर्णयामुळे संविधानाने अनुसूचित जातींमध्ये निर्माण केलेली एकता धोक्यात येईल आणि जातींमध्ये तेढ निर्माण होईल, असा आरोप रिपाइंने केला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी ३ जुलै रोजी राज्यभर या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनानंतर राज्य सरकारचा निषेध नोंदवत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व रिपाइंचे कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता मिसाळ (अण्णा) आणि जिल्हा सचिव सतीश माळगे (दादा) यांनी केले.

या आंदोलनात सरदार आमशीकर, अमोल गवळी, अविनाश कांबळे, हंबीरराव तरटे, सर्जेराव कांबळे, बाळासो कांबळे, सुरेश पाटील, राहुल गलगलेकर, दिनेश पवार, सुभाष धनवडे, जॉन्सन सहेरीया, अजयकुमार सनदे, अलंकार माने, सागर कांबळे, मनोज कांबळे, अभिजीत वसगडे, गणेश भोसले, सुरज रोकडे, रफिक बडागर, बाबासो कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post