छताला मोठ्या प्रमाणात गळती; मुख्याध्यापकांच्या कार्यालयातही पावसाचे ठिबक, भिंतींना ओलावा
जिल्हा प्रतिनिधी : निलेश रामगावकर
तळेगाव दशासर : सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्हा परिषद शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, तळेगाव दशासर येथील इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था उघडकीस आली आहे. शाळेतील अनेक वर्गखोल्यांच्या छताला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून, पावसाचे पाणी थेट वर्गांमध्ये ठिबकत आहे. विशेष म्हणजे मुख्याध्यापकांच्या कार्यालयालाही गळतीने वेढा घातला असून, भिंतींना मोठ्या प्रमाणात ओलावा सुटल्याने संपूर्ण कार्यालयीन वातावरण चिंताजनक बनले आहे.
वर्गखोल्यांमध्ये ठिकठिकाणी पाण्याचे थेंब पडत असल्याने विद्यार्थ्यांना बाके हलवून बसावे लागत आहे. काही ठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने अध्यापन प्रक्रियेत व्यत्यय निर्माण होत असून शिक्षकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गळतीमुळे मुख्याध्यापक कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे, नोंदवही, संगणक, शैक्षणिक अभिलेख व इतर साहित्य धोक्यात आले आहे. पावसाचे पाणी थेट कार्यालयात ठिबकत असल्याने प्रशासनाच्या दृष्टीनेही ही गंभीर बाब मानली जात आहे.
शाळा ही विद्यार्थ्यांच्या भवितव्याची पायाभरणी करणारी जागा असताना, अशा अवस्थेत शिक्षण सुरू ठेवावे लागत असल्याने पालक, ग्रामस्थ आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.
ग्रामस्थांच्या मते, संबंधित शिक्षण विभाग आणि बांधकाम विभागाने त्वरित संयुक्त पाहणी करून छताची दुरुस्ती, गळती रोखण्याची उपाययोजना आणि इमारतीची आवश्यक देखभाल तातडीने हाती घ्यावी. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून कामांना गती देणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे.
पावसाळ्याचा जोर कायम असताना शाळेच्या इमारतीची ही अवस्था प्रशासनासाठी धोक्याची घंटा ठरत असून, वेळीच दुरुस्ती न झाल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह शैक्षणिक कामकाजावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
