शिकागोतील NCSL Legislative Summit 2026 मध्ये आमदार राजूभाऊ तोडसाम यांचा सहभाग; जागतिक अनुभवांचा महाराष्ट्राच्या विकासासाठी उपयोग
शिकागो (अमेरिका) | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील लोकशाही व्यवस्था अधिक सक्षम, पारदर्शक आणि आधुनिक करण्याच्या उद्देशाने आर्णी–केळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांनी अमेरिकेतील शिकागो येथे आयोजित NCSL Legislative Summit 2026 मध्ये सहभाग घेतला आहे.
NLC Bharat आयोजित International Capacity Enhancement Program (ICEP) 2026 अंतर्गत सुरू असलेल्या या शिखर परिषदेत विविध देशांतील विधिमंडळांच्या कार्यपद्धती, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा प्रशासनातील वापर, कायदेविषयक नवकल्पना तसेच लोकशाही अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सखोल चर्चा होत आहे. या परिषदेमुळे जगभरातील तज्ज्ञांसोबत विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळत असून, महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे आमदार तोडसाम यांनी सांगितले.
या दौऱ्यादरम्यान त्यांनी सन १८९३ मध्ये स्वामी विवेकानंद यांनी जागतिक धर्मपरिषदेत मानवतेचा आणि बंधुभावाचा संदेश दिलेल्या ऐतिहासिक Fullerton Hall ला भेट दिली. या ऐतिहासिक स्थळाला भेट देणे हा अत्यंत प्रेरणादायी आणि अविस्मरणीय अनुभव असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम प्रशासनिक पद्धती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रभावी लोकशाही व्यवस्थेचे अनुभव महाराष्ट्राच्या विकासासाठी उपयुक्त ठरतील. जनहित, विकास आणि सक्षम लोकशाहीसाठी जागतिक अनुभवांचा लाभ राज्याला मिळवून देण्याचा प्रयत्न भविष्यातही सुरू राहील, असा विश्वास आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांनी व्यक्त केला.
