किनवटच्या तीन नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी
किनवट : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्या मान्यतेने नवनियुक्त नांदेड उत्तर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठलराव पावडे यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे. दिनांक १७ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत पत्रानुसार किनवट येथील ज्येष्ठ काँग्रेस नेते के. मूर्ती साहेब, सूर्यकांत रेड्डी आणि सौ. नंदिनीताई टारपे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच किनवट शहरातील सक्रिय कार्यकर्ते सिराज जिलानी यांची नांदेड उत्तर ग्रामीण जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्त झालेले के. मूर्ती साहेब हे मागील चार दशकांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून किनवटच्या आदिवासी भागात सामाजिक कार्य करत आहेत. काँग्रेसच्या माध्यमातून गोरगरीब, वंचित आणि गरजू नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले असून त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते.
सूर्यकांत रेड्डी यांनी तालुका अध्यक्ष म्हणून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना बढती देत जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
सौ. नंदिनीताई टारपे या अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने कार्यरत आहेत. त्यांनी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव म्हणून पक्ष संघटन बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प नियोजन व आढावा समितीच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी प्रशासकीय अनुभवाच्या बळावर आदिवासी समाजासाठी विविध विकासकामे आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत योगदान दिले आहे. याशिवाय त्यांनी काँग्रेस सेवा दल महिला जिल्हाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
या नियुक्त्यांमुळे किनवट–माहूर विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांनीही या अनुभवी नेतृत्वामुळे पक्ष संघटना अधिक बळकट होईल, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावीपणे काम होईल आणि आदिवासी भागात काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

