ऑपरेशन कवच अंतर्गत तळेगाव दशासर येथे अमली पदार्थविरोधी जनजागृती रॅली

 



जिल्हा प्रतिनिधी : निलेश रामगावकर

अमरावती | तळेगाव दशासर : राज्य शासनाच्या 'ऑपरेशन कवच' अभियानांतर्गत तळेगाव दशासर येथे पोलिस विभागाच्या वतीने अमली पदार्थविरोधी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या रॅलीला विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

आज सकाळी काढण्यात आलेल्या या रॅलीत माध्यमिक कन्या शाळा तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शाळा परिसरातून सुरू झालेली रॅली गावातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली.

रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी "अमली पदार्थांना नकार, निरोगी जीवनाचा स्वीकार", "व्यसनमुक्त युवक, सक्षम भारत" आणि "अमली पदार्थांपासून दूर राहा, उज्ज्वल भविष्य घडवा" अशा घोषणा देत नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश पोहोचविला.

यावेळी पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांनी अमली पदार्थांचे वाढते दुष्परिणाम, त्यापासून दूर राहण्याची आवश्यकता आणि व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. अशा जनजागृती उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण होऊन व्यसनमुक्त समाजाच्या उभारणीस निश्चितच बळ मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post