अतिक्रमणधारकांकडून जागा मोजणीच्या नावाखाली ₹1,000 वसुलीचा आरोप 'सरपंच पती' संस्कृती पुन्हा चर्चेत; शेंदुर्जना खुर्दमध्ये वसुलीच्या आरोपाने खळबळ

 


Prahar dhamangav railway



Dhamangav railway

जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर 

धामणगाव रेल्वे : धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेंदुर्जना खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच शीतल समोसे यांचे पती संतोष समोसे यांनी अतिक्रमणधारकांना जागा मोजून देण्याच्या नावाखाली प्रति व्यक्ती ₹1,000 प्रमाणे पैसे घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकरणी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी योगेश वानखडे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून, संबंधित प्रकरणाची चौकशी करून घेतलेले पैसे परत मिळावेत तसेच शासनाच्या योजनेनुसार अतिक्रमणधारकांना हक्काचे प्लॉट उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

तक्रार देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख सुरज गंथडे पंचायत समितीत आले असता, संतोष समोसे हे अतिक्रमणधारकांच्या फाईली घेऊन तेथे उपस्थित होते. यावेळी काही अधिकाऱ्यांनी त्यांना "सरपंच साहेब" अशी हाक मारल्याने गंथडे यांनी तीव्र आक्षेप नोंदविला. महिला सरपंच असताना त्यांच्या पतीकडून ग्रामपंचायतीचा कारभार चालवला जात असल्याचा आरोप करत, हा प्रकार महिला सक्षमीकरणाच्या उद्देशालाच हरताळ फासणारा असल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान, गावातील एका व्यक्तीकडून तब्बल ₹10 हजार घेतल्याची चर्चा रंगली होती. ही बाब गावात चर्चेचा विषय झाल्यानंतर संबंधित रक्कम परत करण्यात आल्याचा दावा काही नागरिकांनी केला आहे. मात्र, संतोष समोसे यांनी कोणाकडूनही ₹10 हजार घेतले नसल्याचे सांगत आरोप फेटाळले आहेत. तसेच ज्यांच्याकडून ₹1,000 घेतल्याचा आरोप आहे, त्यांनीही आपले पैसे परत मिळावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण देऊनही अनेक ठिकाणी प्रत्यक्ष कारभार त्यांच्या पतींकडूनच चालवला जात असल्याचे चित्र दिसत असून, या प्रकरणामुळे पुन्हा एकदा 'सरपंच पती' संस्कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post