माहूर | प्रतिनिधी
माहूर तालुक्यात महावितरणकडून सायंकाळी ७ ते रात्री १०.३० या वेळेत सुरू असलेल्या भारनियमनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत सहाय्यक अभियंता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, माहूर यांना जनहितार्थ निवेदन सादर करून रात्रीचे भारनियमन तात्काळ बंद करून आवश्यक असल्यास ते दिवसा करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सायंकाळची वेळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी, महिलांच्या घरगुती कामांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या काळातील वीज कपातीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मोठा फटका बसत आहे.
तसेच पावसाळ्यात ग्रामीण भागात साप, विंचू व इतर विषारी प्राण्यांचा वावर वाढत असल्याने रात्रीच्या अंधारामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महावितरणने रात्रीचे भारनियमन तात्काळ स्थगित करून आवश्यक असल्यास दिवसा वीज कपात करावी, तसेच सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यायी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा जनहितासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
यावेळी निवेदन देताना तालुका प्रमुख जितू चोले, संतोष जाधव, लक्ष्मण राठोड, बंडू राठोड, राजेश चव्हाण आणि पवन गवळी उपस्थित होते.

