राज्यातील सर्व शासकीय आश्रम शाळांची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी एकात्मिक आदिवासी विकास आयुक्त, नाशिक यांच्याकडे करण्यात आली आहे.
निवेदनात आश्रम शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी, सुसज्ज ग्रंथालय व अभ्यासिका, स्वच्छतागृहे, स्नानगृहे, दर्जेदार व पौष्टिक भोजन, नियमित आरोग्य तपासणी, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी व परिचारिका, सुरक्षित वसतिगृह, वीज, पंखे, प्रकाश व्यवस्था तसेच सुरक्षा सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच शिक्षक व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत, विद्यार्थ्यांना वेळेवर शैक्षणिक साहित्य, गणवेश व इतर आवश्यक सुविधा मिळाव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.
आश्रम शाळांची नियमित तपासणी करून विद्यार्थ्यांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण, आरोग्य व सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

