आनंदवाडी शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; आदिवासी विकास आयुक्तांकडे तक्रार

Nanded Maharashtra

Anil Bangale Gavakadachibatmi


किनवट | प्रतिनिधी

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा, आनंदवाडी येथील विद्यार्थ्यांना अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप करत एकात्मिक आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.

निवेदनात शाळेत शुद्ध पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था, वापरण्यायोग्य नसलेली स्वच्छतागृहे, आंघोळ व कपडे धुण्यासाठी पाण्याचा तुटवडा, विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे व अपुरे भोजन, तसेच वसतिगृहातील अस्वच्छ व आरोग्यास अपायकारक परिस्थिती यासारख्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या शिक्षणावरही विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यासोबतच शाळेतील शिक्षकांची अपुरी संख्या भरून काढून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची व्यवस्था करणे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून देणे, स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृहे उपलब्ध करणे, पौष्टिक व दर्जेदार भोजन नियमित देणे, तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक स्वच्छता व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर योग्य प्रशासकीय कारवाई करावी आणि भविष्यात अशा प्रकारच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी नियमित तपासणी व्यवस्था सुरू करावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post