आखिल भारतीय नौजवान सभेच्या पाठपुराव्याला यश; कंत्राटी सफाई कामगारांना सुरक्षा साहित्य उपलब्ध

 

Amaravati, Maharashtra

कामगारांनी रेनकोट, गमबूट, हातमोजे, टोपी व मास्कचा नियमित वापर करावा – मा. सागर दुर्योधन, राज्य सचिव


अमरावती : अमरावती महानगरपालिका अंतर्गत कार्यरत कंत्राटी सफाई कामगारांना आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असून, या निर्णयाचे आखिल भारतीय नौजवान सभेने स्वागत केले आहे. मागील पाच महिन्यांपासून संघटनेने सातत्याने पाठपुरावा करून रेनकोट, गमबूट, हातमोजे, टोपी आणि मास्क यांसारख्या अत्यावश्यक सुरक्षा साहित्याची मागणी लावून धरली होती. अखेर मनपा प्रशासन व कोणार्क कंपनीच्या माध्यमातून हे साहित्य कामगारांना उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

यावेळी आखिल भारतीय नौजवान सभेचे राज्य सचिव मा. सागर दुर्योधन यांनी सर्व कंत्राटी सफाई कामगारांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुरक्षा साहित्याचा नियमित व योग्य पद्धतीने वापर करण्याचे आवाहन केले. स्वच्छता करताना कामगारांना संसर्गजन्य आजार, दूषित कचरा, सांडपाणी तसेच पावसाळ्यातील प्रतिकूल वातावरणाचा सामना करावा लागतो. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी सुरक्षा साहित्याचा वापर अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना मा. सागर दुर्योधन म्हणाले, "कामगारांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. सुरक्षा साहित्य उपलब्ध होणे ही सकारात्मक बाब असली तरी त्याचा नियमित वापर करणे ही प्रत्येक कामगाराची जबाबदारी आहे. तसेच प्रशासनाने भविष्यातही दर्जेदार सुरक्षा साहित्याचा नियमित पुरवठा कायम ठेवावा."

आखिल भारतीय नौजवान सभेने स्पष्ट केले की, सुरक्षा साहित्याची मागणी पूर्ण झाल्याने कामगारांच्या सुरक्षिततेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. मात्र, किमान वेतनाची प्रभावी अंमलबजावणी, सामाजिक सुरक्षा, भविष्य निर्वाह निधी (PF) व इतर कायदेशीर लाभ, सुरक्षित व सन्मानजनक कार्यपरिसर, पुरेसे मनुष्यबळ तसेच कामगार हक्कांची प्रभावी अंमलबजावणी यासाठी संघटनेचा संघर्ष आणि पाठपुरावा यापुढेही सुरू राहणार आहे.

"शहर स्वच्छ ठेवणाऱ्या प्रत्येक सफाई कामगाराचा सन्मान, सुरक्षितता आणि न्याय मिळवून देण्यासाठी आखिल भारतीय नौजवान सभा सातत्याने लढा देत राहील," असा निर्धारही मा. सागर दुर्योधन यांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post