भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या नियंत्रणाखाली विशेष गहन पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) 2026 कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, नांदेड आणि माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, किनवट यांच्या मार्गदर्शनाखाली माहूर तालुक्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.
मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व त्रुटीमुक्त करण्याच्या उद्देशाने बूथ लेव्हल अधिकारी (BLO) घरभेटीद्वारे प्रत्येक मतदाराची माहिती पडताळणार आहेत. या मोहिमेदरम्यान मृत, कायमस्वरूपी स्थलांतरित, दुहेरी नोंद असलेले अथवा अपात्र मतदारांची नावे वगळून पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
विशेष गहन पुनरीक्षण कार्यक्रम 2026 चे वेळापत्रक
30 जून 2026 ते 29 जुलै 2026
घरभेटीद्वारे मतदार पडताळणी, माहिती संकलन व मतदार पडताळणी फॉर्म भरणे.
05 ऑगस्ट 2026
प्रारूप (Draft) मतदार यादी प्रसिद्ध.
05 ऑगस्ट 2026 ते 04 सप्टेंबर 2026
दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी.
03 ऑक्टोबर 2026
दावे व हरकतींचे निवारण पूर्ण.
07 ऑक्टोबर 2026
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध.
मतदारांनी घरभेटीदरम्यान बूथ लेव्हल अधिकाऱ्यांना आवश्यक सहकार्य करावे. मतदार पडताळणी फॉर्म काळजीपूर्वक भरून आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा. तसेच ज्या नागरिकांचे नाव मतदार यादीत समाविष्ट नाही किंवा नाव, पत्ता, वय अथवा इतर तपशीलांमध्ये दुरुस्ती आवश्यक आहे, त्यांनी विहित मुदतीत संबंधित अर्ज सादर करावेत.
माहूर तालुक्यातील सर्व पात्र नागरिकांनी या विशेष गहन पुनरीक्षण कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून आपले नाव मतदार यादीत कायम राहील याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी, माहूर यांनी केले आहे.
– तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी, माहूर

