१५ हजारांहून अधिक लोकसंख्या, शैक्षणिक व आरोग्य सुविधा उपलब्ध; विकासाला चालना मिळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन
विभागीय संपादक/ निलेश रामगावकर
अमरावती/तळेगाव दशासर : तळेगाव दशासर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात गावातील नागरिकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, तळेगाव दशासर हे धामणगाव रेल्वे तालुक्यातील अमरावती जिल्ह्यातील महत्त्वाचे गाव असून, गावाची लोकसंख्या अंदाजे १५ हजारांहून अधिक आहे. गावात शाळा, कॉलेज, आरोग्य केंद्र, अंगणवाड्या तसेच इतर मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. गावाला नागपूर–औरंगाबाद एक्सप्रेस हायवेमुळे जोडणी मिळाली असून, अमरावती जिल्ह्यातील प्रमुख मार्गही तळेगाव दशासर येथून जातो. तसेच समृद्धी महामार्ग गावाजवळून गेला आहे.
तळेगाव दशासरला ऐतिहासिक वारसा लाभलेला असून, गावात शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या शंकरपटाचे आयोजन केले जाते. याशिवाय गावात विविध धार्मिक स्थळे असून, देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वर्दळ असते. त्यामुळे गावाचे महत्त्व वाढत असल्याचे ग्रामपंचायतीने निवेदनात म्हटले आहे.
मात्र, गावाचा विकास लोकसंख्येच्या मानाने कमी पडत असल्याने ग्रामपंचायतीला विकासाच्या दृष्टीने अडचणी येत आहेत. तळेगाव दशासरचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यास विकासाची दारे खुली होतील, बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील तसेच गावात सुलभ सुविधा निर्माण करता येतील, असा विश्वास निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.
नगरपंचायतीच्या रूपांतरामुळे गावाच्या विकासाला गती मिळून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा गावातील नागरिकांनी व ग्रामपंचायतीने व्यक्त केली आहे.
निवेदनासोबत ग्रामसभेचा ठराव जोडण्यात आला असून, त्याची प्रत महसूल मंत्री (पालकमंत्री) चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्हाधिकारी, अमरावती यांना माहितीस्तव व कार्यवाहीसाठी सादर करण्यात आली आहे.
या करिता समस्त गावकऱ्यांच्या वतीने एकमताने ठराव पास करण्यात आला.

