वाशिम : बहुजन समाज पार्टीची जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण आढावा बैठक ६ सप्टेंबर रोजी वाशिम येथील सर्किट हाऊस येथे उत्साहात पार पडली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करणे आणि मतदार यादीतील नावांबाबत जनजागृती करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.
बैठकीला बसपाचे प्रदेश सचिव पंडित दादा बोर्डे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष ॲड. राहुल गवई होते. जिल्हा प्रभारी भाऊराव वासनिक, ॲड. संघनायक मोरे, प्रकाश आठवले, रुपेश भगत यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पंडित दादा बोर्डे यांनी मतदार यादीत प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव समाविष्ट असणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत, कार्यकर्त्यांनी गावागावात मतदार यादी तपासून नाव नसलेल्या नागरिकांना नाव नोंदणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
तसेच बैठकीत पक्षाच्या विविध पदांवर नवीन नियुक्त्या करण्यात आल्या. पुष्पाताई खंडारे यांची महिला जिल्हाध्यक्ष, राहुल मैंदकर यांची जिल्हा उपाध्यक्ष, नरेंद्र खडसे यांची जिल्हा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. यासह विविध विधानसभा व तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्याही नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद अंभोरे यांनी केले, तर आभार प्रकाश आठवले यांनी मानले. बैठकीला वाशिम जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रांचे प्रमुख, जिल्हा पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने बसपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

