Gavakadachi batmi network
अमरावती,वरुड : वरुड-मोर्शी मतदारसंघात सध्या पांदण रस्त्यांचा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेत आणला जात असताना, शेतकऱ्यांच्या खऱ्या आणि मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होत असल्याचे मत आक्रोश जनशक्ती संघटनेचे संस्थापक सुशील बेले यांनी व्यक्त केले आहे.
बेले म्हणाले की, पांदण रस्ते हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहेतच. मात्र आज शेतकरी कर्जमाफी, खतांच्या वाढत्या किमती, शेतमालाला योग्य भाव, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान, पीकविमा आणि विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी संघर्ष करत आहे. अशा वेळी केवळ एका विषयाला केंद्रस्थानी ठेवून संपूर्ण राजकारण फिरवले जात असल्याचे चित्र दिसत आहे.सुशील बेले यांनी प्रश्न उपस्थित केला की, मतदारसंघातील आजी आणि माजी आमदार हे दोघेही सत्तेशी संबंधित असूनही विकासाच्या प्रश्नांवर एकत्रितपणे काम करण्याऐवजी पांदण रस्त्यांच्या विषयावर अधिक राजकारण होताना दिसत आहे. नागरिकांना आता आरोप-प्रत्यारोपांपेक्षा विकासकामांची गती, रोजगाराच्या संधी, आरोग्य सुविधा आणि शेतकरी कल्याण याबाबत ठोस कृती अपेक्षित आहे.
बेले यांनी असेही नमूद केले की, पांदण रस्त्यांच्या विषयावर सक्रिय असलेल्या काही घटकांच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू आहेत. मागील काळात एका राजकीय गटासोबत काम करणारे काही लोक आज दुसऱ्या गटासोबत दिसत असल्याने या विषयामागील उद्दिष्टांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या सर्व बाबींमध्ये पारदर्शकता असणे आवश्यक आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचा विश्वास कायम राहील.
त्यांनी पुढे सांगितले की, रोजगार सेवक ,रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणारे मजूर, मस्टरवर काम करणारे कामगार आणि सर्वसामान्य शेतकरी यांच्या हिताचे रक्षण करणे ही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. कोणत्याही वादाचा फटका या घटकांना बसता कामा नये.मतदारसंघातील जनतेला वाद नकोत, तर विकास हवा आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी आहे, युवकांना रोजगार हवा आहे, विद्यार्थ्यांना शिक्षण हवे आहे आणि नागरिकांना आरोग्य सुविधा हव्यात. त्यामुळे आजी आणि माजी आमदारांनी परस्पर संघर्ष बाजूला ठेवून विकासासाठी एकत्रितपणे काम करावे कारण सत्तेत असणाऱ्या पार्ट्यांचे हे माजी आणि आजी आमदार आहेत, असे मत सुशील बेले यांनी व्यक्त केले.
